Headlines

राज्यातील 42.30 लाख शेतकऱ्यांना पुढील 3 महिने मोफत धान्य:नर्मदा-तापी वळण योजनेसाठी 5548 कोटी, राज्य मंत्रिमंडळाचे 14 महत्त्वाचे निर्णय




राज्यातील सर्वसामान्य शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक आणि गुंतवणूकदारांना मोठा दिलासा देणारे 14 महत्त्वाचे निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (25 नोव्हेंबर) झालेल्या बैठकीत घेण्यात आले आहेत. यामध्ये राज्यातील 33 जिल्ह्यांतील 42 लाख 30 हजार 783 शेतकऱ्यांना पुढील 3 महिने प्रत्येकी 5 किलो मोफत धान्य देण्यापासून ते नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा-तापी वळण योजनेसाठी 5548 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यापर्यंतच्या लोककल्याणकारी निर्णयांचा समावेश आहे. यासोबतच आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्थांच्या मालमत्ता जप्तीसाठी स्वतंत्र ‘एमपीआयडी’ (MPID) न्यायाधिकरण स्थापन करून 90 दिवसांत खटले निकाली काढणे आणि खासगी अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालयांतील ग्रंथपालांना 7 वा वेतन आयोग लागू करण्यासही मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. शेतकरी आणि सिंचनासाठी मोठे निर्णय दुष्काळी पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा आणि सिंचनाची शाश्वती देण्यासाठी दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील दारिद्र्यरेषेखालील आणि डीबीटी (DBT) योजनेत समाविष्ट नसलेल्या राज्यातील 33 जिल्ह्यांतील 42 लाख 30 हजार 783 शेतकऱ्यांना पुढील 3 महिने मोफत अन्नधान्य दिले जाणार आहे. यामध्ये प्रतिव्यक्ती 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू असे एकूण 5 किलो धान्य मिळणार आहे. नर्मदा-तापी वळण योजनेसाठी 5548 कोटींची तरतूद नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा-तापी वळण योजनेसाठी 5548 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. या अंतर्गत 6 वळण बंधाऱ्यांचे नियोजन असून, यामुळे परिसरातील सुमारे 26526 हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे आणि 11.50 मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे. गुंतवणूकदारांचे संरक्षण आणि महसूल सुधारणा गुंतवणूकदारांची फसवणूक रोखणे आणि महसूल विभागातील प्रलंबित दावे जलदगतीने निकाली काढण्यासाठी कायद्यात महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्थांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासाठी स्वतंत्र एमपीआयडी (MPID) न्यायाधिकरण स्थापन केले जाणार असून, 90 दिवसांच्या आत प्रकरण निकाली काढण्याची कालमर्यादा निश्चित केली जाईल. यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमात सुधारणा करण्यास मंजुरी दिली आहे. महसूल न्यायालयांसाठी ‘1 जिल्हा, 1 अपील’ तरतूद महसूल विभागातील अर्धन्यायिक कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी ‘महसूल न्यायालय दावा व्यवस्थापन प्रणाली’ (RCCMS) लागू करण्यात येणार आहे. तसेच, प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी ‘1 जिल्हा, 1 अपील’ ही तरतूद लागू करण्याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली. मुद्रांक अधिनियमात सुधारणा अभिनिर्णय फी आणि अपील फीच्या दरांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 32 (ब) आणि कलम 53 (1अ) मध्ये सुधारणा करणारे विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात सादर केले जाईल. मौदा नगर पंचायतीला शासकीय जमीन नागपूर जिल्ह्यातील मौदा नगर पंचायतीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी शासकीय जमीन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रासाठी निर्णय शिक्षण आणि आरोग्य शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी अनेक दिलासादायक निर्णय घेण्यात आले आहेत. आरोग्य विज्ञान व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EBC, SEBC, EWS) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत सुधारित दराने भत्ता मिळणार असून भोजन, निवास आणि निर्वाह भत्त्यात भरीव वाढ करण्यात आली आहे. ग्रंथपालांना 7 वा वेतन आयोग लागू शासकीय वैद्यकीय, दंत व आयुर्वेद महाविद्यालयांतील पूर्णवेळ ग्रंथपालांप्रमाणेच आता खासगी अनुदानित आयुर्वेद आणि खासगी अनुदानित युनानी महाविद्यालयांतील पूर्णवेळ ग्रंथपालांना 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार सुधारित वेतन संरचना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली. शालार्थ कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक सक्षमीकरण सुविधा शालार्थ प्रणालीत समाविष्ट असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (RBI) नोंदणीकृत बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या (NBFC) माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. खासगी अनुदानित शाळांसाठी नवा कायदा खासगी अनुदानित शाळांच्या नियमनासाठी सर्वसमावेशक कायदा तयार करण्याकरिता ‘महाराष्ट्र खासगी अनुदानित शाळा (विनियमन) विधेयक, 2026’ च्या प्रारूपास आणि ते विधिमंडळात सादर करण्यास मंजुरी मिळाली आहे. विद्यापीठ अधिनियमांत सुधारणा कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक अधिनियम, 1997 आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अधिनियम, 1989 मधील कुलसचिव नियुक्ती, परिनियम, वित्त व लेखा समिती, इमारत बांधकाम समिती आणि वार्षिक लेखे यांसारख्या परिभाषांमध्ये एकसमानता आणण्यासाठी सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. ॲक्युपंक्चर चिकित्सा पद्धती वगळणार राष्ट्रीय सहयोगी आणि आरोग्यसेवा व्यवसाय आयोग अधिनियम, 2021 (NCAHP कायदा, 2021) मधून ॲक्युपंक्चर चिकित्सा पद्धती वगळण्यासाठी आवश्यक सुधारणा विधेयकाच्या प्रारूपास मंजुरी देण्यात आली. कामगार कल्याण आणि लोकसेवा हक्क कायद्यात सुधारणा माथाडी कामगार व सुरक्षा रक्षक कायद्यात सुधारणा महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, 1969 आणि महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, 1981 या दोन्ही कायद्यांमध्ये कालसुसंगत सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. लोकसेवा हक्क कायद्यात सुधारणा नागरिकांना शासकीय सेवा अधिक प्रभावीपणे मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 मधील तरतुदींमध्ये सुधारणा करणारा अधिनियम विधिमंडळासमोर मांडण्यास मंजुरी देण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *