![]()
पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख असलेल्या झाडीपट्टी परिसरात सध्या दिवाळीनंतरच्या मंडई आणि शंकरपटाच्या लोकोत्सवाने उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे. धान कापणीची लगबग संपल्यानंतर ग्रामीण भागात सुरू होणारा हा उत्सव म्हणजे केवळ मनोरंजनाचा सोहळा नसून, ग्रामीण जीवनशैली, परंपरा, लोककला आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवणारा सांस्कृतिक वारसा आहे. गावागावांत भरलेल्या मंडई, पारंपरिक ढालीच्या मिरवणुका, आदिवासी गोंडी नृत्य, ढोल-ताशांचा गजर, बैलजोड्यांच्या शर्यती आणि रात्रभर रंगणाऱ्या नाटकांमुळे संपूर्ण झाडीपट्टी परिसर लोकोत्सवाच्या रंगात न्हाऊन निघाला आहे. दिवाळीनंतर मंडईचे वेध लागले की गावागावांतील वातावरणच बदलून जाते. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त शहरात स्थायिक झालेली मंडळी या काळात आवर्जून आपल्या गावी परततात. लेकी-सुना, नातेवाईक, मित्रपरिवार आणि पाहुण्यांच्या आगमनाने घराघरांत आनंदाचे वातावरण निर्माण होते. अनेक घरांमध्ये पाहुण्यांची एवढी गर्दी होते की उपलब्ध जागाही अपुरी पडते. मात्र, या गर्दीतूनच ग्रामीण भागातील नात्यांची घट्ट वीण, आपुलकी आणि एकमेकांप्रती असलेले प्रेम अनुभवायला मिळते. वर्षभर शेतीच्या कामात व्यस्त असलेल्या शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी हा उत्सव आनंदाचे काही क्षण घेऊन येतो. मंडईच्या निमित्ताने दिवसा बाजारपेठेत खरेदी-विक्रीची लगबग असते, तर रात्री सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाट्यप्रयोगांची रंगत अनुभवायला मिळते. त्यामुळे मंडई ही केवळ धार्मिक किंवा व्यावसायिक जत्रा न राहता गावातील प्रत्येक घटकाला एकत्र आणणारा सामाजिक आणि सांस्कृतिक सोहळा बनली आहे. ढालीच्या मिरवणुकीतून गावाच्या अस्मितेचे दर्शन झाडीपट्टीच्या मंडईतील सर्वांत महत्त्वाचे आणि आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक ढाल. बांबू, रंगीबेरंगी कागद, आकर्षक कापड, चमचमत्या पट्ट्या आणि फुलांच्या माळांनी सजवलेली भव्य ढाल मंडईच्या उत्सवाला वेगळीच शोभा आणते. काही ठिकाणी चांदी आणि पितळेच्या नक्षीकामाने सजवलेल्या ढालीही पाहायला मिळतात. वाद्यांच्या गजरात ढालीची मिरवणूक काढली जाते. ढालीचे पूजन करून पारंपरिक पद्धतीने तिचे दर्शन घडवले जाते. ढोल-ताशे आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर ग्रामस्थांचा उत्साह शिगेला पोहोचतो. ढाल ही केवळ सजावटीची वस्तू नसून गावाच्या परंपरेचे, अस्मितेचे आणि एकजुटीचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे ढालीच्या मिरवणुकीला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण या मिरवणुकीत उत्साहाने सहभागी होतात. परंपरेचे हे रूप पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम अशा आयोजनातून होत आहे. लाखांदूरमध्ये गोंडी नृत्याचा ठेका; लोककलेचा जागर लाखांदूर येथील गांधी चौक मित्र परिवाराच्या वतीने आयोजित मंडई आणि नाट्यसोहळ्याने शहरवासीयांचे विशेष लक्ष वेधून घेतले. पारंपरिक ढालीची मिरवणूक, आदिवासी गोंडी नृत्य, ढोल-ताशांचा दणदणाट आणि आकर्षक झांक्यांमुळे संपूर्ण शहर उत्सवी वातावरणाने भारावून गेले. गोंडी नृत्याच्या तालावर थिरकणारे कलाकार, पारंपरिक वेशभूषा, वाद्यांचा निनाद आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे लोककलेचे मनोहारी दर्शन घडले. आधुनिक मनोरंजनाच्या साधनांचा प्रभाव वाढत असताना पारंपरिक नृत्य, वाद्ये आणि लोककलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या सोहळ्यातून करण्यात आला. विशेष म्हणजे, अशा कार्यक्रमांमुळे नव्या पिढीला आपल्या पूर्वजांच्या सांस्कृतिक परंपरांची ओळख होते. स्थानिक लोककलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते आणि ग्रामीण संस्कृतीचे वैभव नव्या पिढीपर्यंत पोहोचते. शंकरपटाचा थरार; बैलजोड्यांच्या वेगवान दौडीने मैदान दुमदुमले मंडईच्या उत्सवातील आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे शंकरपट. गावाबाहेरील मोकळ्या पटांगणावर आयोजित करण्यात येणाऱ्या बैलजोड्यांच्या शर्यती पाहण्यासाठी परिसरातील हजारो नागरिक गर्दी करतात. वर्षभर शेतीच्या कामात शेतकऱ्यांसोबत राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा म्हणूनही शंकरपटाला ग्रामीण भागात विशेष महत्त्व आहे. सुमारे १५० ते २०० मीटरच्या सरळ धावपट्टीवर बैलजोड्यांची वेगवान दौड रंगते. शर्यतीत सहभागी होणाऱ्या बैलजोड्यांची चपळाई, वेग आणि ताकद पाहून प्रेक्षक रोमांचित होतात. स्थानिक परिसरासह शेजारील राज्यांतील नामांकित बैलजोड्याही या स्पर्धेत सहभागी होतात. निर्धारित अंतर कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी बैलजोड्या आणि त्यांचे मालक प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. शर्यतीतील विजेत्या बैलजोडीच्या मालकाला रोख रक्कम, ढाल, चांदीची गदा आणि मानाचा फेटा देऊन गौरविण्यात येते. शर्यतीदरम्यान मैदानाच्या दोन्ही बाजूंना प्रेक्षकांची मोठी गर्दी असते. प्रत्येक बैलजोडीच्या प्रवेशावेळी आणि अंतिम रेषा पार करताना प्रेक्षकांकडून टाळ्या आणि घोषणांनी उत्साह वाढवला जातो. विजेत्या बैलजोडीच्या नावाने होणारा जल्लोष शंकरपटाची रंगत आणखी वाढवतो. त्यामुळे मंडईच्या काळात शंकरपट पाहण्यासाठी दूरवरूनही नागरिक लाखांदूर आणि परिसरातील गावांमध्ये दाखल होतात. ‘ज्या गावात नाटक नाही, ती मंडई कसली?’ झाडीपट्टीच्या मंडईचा खरा आत्मा म्हणजे रात्रभर रंगणारे नाटक. ‘ज्या गावात नाटक नाही, ती मंडई कसली?’ ही स्थानिक म्हण या भागातील नाट्यपरंपरेचे महत्त्व अधोरेखित करते. दिवसभर मंडई आणि शंकरपटाचा आनंद घेतल्यानंतर रात्री गावातील नाट्यप्रयोगांना सुरुवात होते. अनेक ठिकाणी हे प्रयोग रात्री उशिरा सुरू होऊन थेट पहाटे सूर्योदयापर्यंत रंगतात. थंडीच्या दिवसांत अंगावर घोंगडी घेऊन, शेकोटीची ऊब घेत हजारो नाट्यरसिक नाटकांचा आनंद लुटतात. पहाटेपर्यंत जागून नाटक पाहण्याची ही परंपरा झाडीपट्टीच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. कौटुंबिक, सामाजिक, भावनिक आणि प्रबोधनात्मक विषयांवर आधारित नाटकांसोबतच झाडीबोलीतील खणखणीत विनोद, लावणी, गवळण, सुगम संगीत आणि कोळीगीतांची मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळते. देसाईगंज (वडसा) येथील नामांकित नाट्य कंपन्यांसह परिसरातील विविध हौशी नाट्यमंडळेही मंडईच्या निमित्ताने आपली कला सादर करतात. स्थानिक बोलीभाषा, ग्रामीण जीवनातील प्रश्न, सामाजिक वास्तव आणि नातेसंबंधांचे विविध पैलू नाटकांतून मांडले जातात. त्यामुळे या नाटकांना स्थानिक प्रेक्षकांकडून विशेष प्रतिसाद मिळतो. या रंगमंचामुळे नवोदित कलाकारांना अभिनयाची संधी मिळते, तर अनुभवी कलाकारांच्या सादरीकरणातून झाडीपट्टीच्या नाट्यपरंपरेला नवे बळ मिळते. ग्रामीण संस्कृतीचा वारसा जपणारा लोकोत्सव झाडीपट्टीतील मंडई आणि शंकरपट हे ग्रामीण जीवनातील आनंदाचे, एकोप्याचे आणि सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक आहेत. वर्षभर शेतीच्या कामात व्यस्त असलेल्या शेतकरी कुटुंबांना या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येण्याची संधी मिळते. नातेवाईकांच्या भेटीगाठी, गावातील सामूहिक कार्यक्रम, पारंपरिक खेळ, लोकनृत्य आणि नाट्यप्रयोग यांमधून सामाजिक संबंध अधिक दृढ होतात. आधुनिक मनोरंजनाची साधने आणि बदलती जीवनशैली यांचा प्रभाव वाढत असतानाही झाडीपट्टीतील मंडईची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने जपली जात आहे. ढालीची मिरवणूक, गोंडी नृत्याचा ठेका, शंकरपटातील बैलजोड्यांचा थरार आणि पहाटेपर्यंत चालणाऱ्या नाटकांची रंगत या प्रत्येक घटकातून या प्रदेशाचे स्वतंत्र सांस्कृतिक वैशिष्ट्य दिसून येते. विशेष म्हणजे, या उत्सवातून केवळ मनोरंजन होत नाही, तर स्थानिक कलाकार, लोककलावंत, नाट्यसंस्था आणि ग्रामीण व्यावसायिकांनाही व्यासपीठ मिळते. परंपरा जपण्यासोबतच पुढील पिढीला आपल्या मातीशी आणि संस्कृतीशी जोडण्याचे काम हा लोकोत्सव करत आहे. म्हणूनच झाडीपट्टीची मंडई म्हणजे केवळ दिवाळीनंतर भरणारी जत्रा नसून, ग्रामीण जीवनातील आनंद, नात्यांची ऊब, लोककलेचा अभिमान आणि पिढ्यान्पिढ्या जपला गेलेला सांस्कृतिक वारसा जिवंत ठेवणारा उत्सव आहे. हेही वाचा….. 4 दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आलेल्या आरोपीवर पुण्यात कोर्टाबाहेरच जीवघेणा हल्ला:गोळीबारानंतर कोयत्याने दोन्ही हात छाटले; सुप्रिया सुळे, वडेट्टीवारांचा गृहखात्यावर संताप अवघ्या 4 दिवसांपूर्वीच तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेल्या एका हत्या प्रकरणातील आरोपीवर पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला झाला. 20 एप्रिल 2025 रोजी कात्रज येथील संतोषनगरमध्ये झालेल्या शुभम सुभाष चव्हाण याच्या हत्येतील मुख्य आरोपी मंदार मारुती किवळे याच्यावर बुधवारी (25 नोव्हेंबर) दुपारी पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या गेट नंबर 4 बाहेर अत्यंत क्रूरपणे हल्ला करण्यात आला आहे. न्यायालयीन कामकाजासाठी आला असता 6 ते 7 हल्लेखोरांनी सापळा रचून आधी त्याच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. या रक्तरंजित थरारानंतर पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेवरून राजकारण तापले असून खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. याप्रकरणी 7 संशयित आरोपींची नावेही समोर आली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. सविस्तर वाचा…..
Source link
दिवाळीनंतर झाडीपट्टीत मंडईचा जल्लोष:ढालीच्या मिरवणुका, गोंडी नृत्य, शंकरपटाचा थरार अन् पहाटेपर्यंत रंगणाऱ्या नाटकांनी ग्रामीण संस्कृतीचा जागर