संसदेच्या विशेष अधिवेशनात मांडल्या जाणाऱ्या डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असतानाच, आमदार रोहित पवार यांनी शनिवारी (28 नो
.
एकीकडे पक्षाचे काही नेते आणि खासदार डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या व सत्तेत जाण्याच्या बाजूने असल्याची चर्चा रंगली असताना, रोहित पवार यांनी विरोधात राहूनच लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. “2022 मध्ये अजितदादांनी वेगळा निर्णय घेतला, तेव्हा नातं बाजूला ठेवून मी विचाराच्या बाजूने लढलो; आजही आणि उद्याही तीच भूमिका कायम असेल,” असे ठणकावून सांगतानाच, अजितदादांना जाऊन 10 महिने पूर्ण होऊनही त्यांच्या अपघात किंवा घातपात प्रकरणाचा साधा एफआयआर (FIR) देखील दाखल झालेला नाही, अशी तीव्र खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
बहुतेकांनी सत्यापेक्षा सत्तेला महत्त्व दिले; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
डिलिमिटेशन विधेयकाच्या निमित्ताने शरद पवार गट भाजपसोबत सत्तेत सामील होऊन केंद्रात व राज्यात मंत्रिपदे मिळवणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी #AjitdadaPawar या हॅशटॅगसह आपली भूमिका स्पष्ट केली. “आदरणीय अजितदादांना जाऊन आज 10 महिने पूर्ण झाले, परंतु अद्यापही त्यांच्या अपघात/घातपात प्रकरणाचा ना FIR झाला ना कुठला तपास झाला. आभाळाएवढा माणूस गेला, पण या घटनेच्या तपासाबाबत कुणालाही सोयरसुतक नाही,” अशी खंत रोहित पवार यांनी व्यक्त केली.
सत्तेपेक्षा विचारांची बाजू महत्त्वाची
“बहुतेकांनी सत्यापेक्षा सत्तेला महत्त्व दिल्याचे मी बघितले आणि बघतोय. पण काहीही झाले तरी दादांसाठीचा आणि जनतेसाठीचा आमचा लढा थांबणार नाही. 2022 मध्ये दादांनी वेगळा निर्णय घेतला, तेव्हा नातं बाजूला ठेवून मी विचाराच्या बाजूने लढलो. आजही आणि उद्याही तीच भूमिका कायम असेल,” असे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या विधानातून त्यांनी पक्ष नेतृत्वाने जरी वेगळा निर्णय घेतला तरी आपण भाजपसोबत सत्तेत जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
शरद पवार गटात दोन प्रवाह?
संसदेच्या विशेष अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारला मोठी मदत होणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाने आपली भूमिका बदलल्यास केंद्र सरकारचा डिलिमिटेशन विधेयक मंजूर करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. या मुद्द्यावरून पक्षात दोन प्रवाह निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे खासदार सुप्रिया सुळे व पक्षाचे खासदार या विधेयकाला सकारात्मकता दाखवत असताना, दुसरीकडे रोहित पवार यांनी मात्र याला कडाडून विरोध दर्शवला आहे. पक्षातील इतर नेते सत्तेत जाण्यास उत्सुक असले तरी रोहित पवार यांनी वेगळी वाट निवडण्याचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
रोहित पवारांपाठोपाठ समर्थक नेते विकास लवांडे यांचीही पोस्ट व्हायरल
रोहित पवार यांच्या भूमिकेनंतर त्यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विकास लवांडे यांची सोशल मीडियावरील पोस्टही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. डिलिमिटेशन विधेयक आणि सत्तेत सहभागी होण्याच्या चर्चांवर भाष्य करताना विकास लवांडे यांनी लिहिले की, “मी आजपर्यंत आरएसएस (RSS) आणि भाजप या विचारधारेचा कधीही समर्थक नव्हतो आणि उद्याही नसेल. वैचारिक व तात्विक तडजोड मी माझ्या आयुष्यात केलेली नाही आणि करणारही नाही. तो संघर्ष माझा कायम असेल. पुरोगामी, धर्मनिरपेक्ष विचारधारा आणि संवैधानिक मूल्ये मी कदापि सोडू शकत नाही.” रोहित पवार आणि विकास लवांडे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे शरद पवार गटातील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत.
——————————————————————-
हेही वाचा…
राज ठाकरेंनी 2023 मध्येच केली होती भविष्यवाणी: ”पवारांची पहिली टीम सत्तेच्या दिशेने गेली, यथावकाश दुसरी टीमही सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच!”

केंद्र सरकारने आणलेल्या डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) आणि महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) एनडीएला (NDA) पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांमुळे शनिवारी (28 नोव्हेंबर) राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी शरद पवार गटाच्या या संभाव्य भूमिकेवर ‘पाठीत खंजीर खुपसला’ अशा शब्दांत टीका सुरू केलेली असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2 जुलै 2023 रोजी केलेले एक जुने ट्विट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी