![]()
मुंबई पोलिसांनी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये झालेल्या 2 मृत्यूप्रकरणी ड्रग्जचा मुख्य पुरवठादार महेश उर्फ मार्क खेमलानी याला अटक केली आहे. महेश हा शुक्रवारी पोलंडहून मुंबईला आला होता. तो विमानतळावर उतरताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांचा आकडा 12 वर पोहोचला आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये गत 11 एप्रिल रोजी नेस्को व इन्स्पायरिंग टाय प्रॉडक्शनच्या वतीने ‘999999999-टेक्नो इव्हेंट’ या लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ड्रग्जचा ओव्हरडोस झाल्यामुळे बिस्मातसिंग भसीन व श्रेया राय या एमबीएच्या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी वनराई पोलिसांनी सदोष मनुष्यवध व अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून विहान उर्फ आकाश समळ, सनी जैन, रौनक खंडेलवाल, बालकृष्णन कुरूप, प्रतीक पांडे, आनंद पटेल, विनीत गेरेलानी, शुभ अग्रवाल, आयुष साहित्य, प्रदीप गुप्ता व जिया जेकब या 11 जणांना अटक केली होती. पोलिसांनी या सर्व आरोपींची कसून चौकशी केली. त्यात महेश उर्फ मार्क खेमलानी हा ड्रग्जच्या गोळ्यांचा पुरवठादार असल्याचे निष्पन्न झाले. पण या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून महेश परदेशात पसार झाला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात लूक आउट नोटीस जारी केली होती. त्यानुसार, पोलंडहून परत येताच मुंबई पोलिसांनी विमानतळावरच त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 6 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. कोण आहे महेश उर्फ मार्क खेमलानी? महेश उर्फ मार्क खेमलानी हा अनिवासी भारतीय आहे. सध्या तो हाँगकाँगमध्ये वास्तव्यास आहे. मुंबईत आल्यानंतर तो मिरा रोड भागात राहतो. त्यामुळे तो परदेशातून अंमली पदार्थ आणून त्याची मुंबईत विक्री करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याने आतापर्यंत किती ड्रग्जची विक्री केली व त्याने हे ड्रग कोणत्या मार्गाने भारतात आणले याची चौकशी आता पोलिसांकडून केली जाणार आहे. पोलिसांनी नेस्को ड्रग्ज प्रकरणाचा तपास करताना ड्रग्ज विक्रीचे आर्थिक व्यवहारांचाही धुंडाळा घेतला. त्यात मुलांनी घेतलेल्या गोळ्यांचे पैसे अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्या जिया जेकब हिच्याकडे पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुढील आर्थिक व्यवहारांत जिया व महेश यांच्यात लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे सोर आले. आतापर्यंतच्या तपासात या दोघांमध्ये 50 लाखांहून अधिकचा व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. जिया 2012 पासून मार्कच्या संपर्कात होती. तसेच 4 वर्षांपासून त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होती. तिचे खासगी बँकमध्ये असलेले खाते हे ती व खेमलानी हे दोघे वापरत असल्याने मार्क कुणाच्या संपर्कात आहे? आणि त्याचे काय – काय व्यवसाय आहेत? याची जियाला पूर्ण माहिती असल्याचाही पोलिसांचा दावा आहे.
Source link
नेस्को सेंटर ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई:ड्रग्ज पुरवठादार महेश उर्फ मार्क खेमलानी याला अटक; पोलंडहून परतताच ठोकल्या बेड्या