![]()
गणेश विसर्जन मिरवणुकीत उत्साह, भक्ती आणि जल्लोषासोबतच सामाजिक व शैक्षणिक जनजागृतीचा संदेश देत सावेडी उपनगरात ‘माझी हरवलेली मराठी शाळा’ हा आगळावेगळा उपक्रम साकारण्यात आला. मोरया युवा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या मिरवणुकीत शालेय गणवेश परिधान केलेल्या ढोलवादक विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरातून मराठी शाळा आणि मातृभाषा संवर्धनाचा संदेश दिला. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळाचे अध्यक्ष अर्जुन मदान यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. मिरवणुकीच्या प्रारंभी महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. त्यानंतर उपस्थित भाविक तसेच ढोल पथकातील विद्यार्थ्यांनी मराठी शाळा आणि मातृभाषेला प्रोत्साहन देण्याची प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर शाळेची घंटा वाजवून मिरवणुकीला औपचारिक सुरुवात करण्यात आली. गणांत प्रतिष्ठान ढोल-ताशा पथकाने केलेल्या दमदार वादनाने परिसर दणाणून गेला. या मिरवणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे शालेय गणवेशातील ढोलवादक विद्यार्थी. गणवेश, दप्तर, पुस्तके आणि शाळेची घंटा अशा प्रतीकांमधून एकेकाळच्या मराठी शाळेचे भावविश्व साकारण्यात आले. ढोल-ताशांच्या तालावर विद्यार्थ्यांनी केलेल्या वादनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. गणेशोत्सवाच्या उत्साहातही मराठी शाळा आणि मातृभाषेच्या संवर्धनाचा गंभीर प्रश्न प्रभावीपणे मांडण्यात आला. आजच्या स्पर्धात्मक युगात इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि आधुनिक शिक्षणाचे महत्त्व निश्चितच आहे. मात्र, इंग्रजीच्या प्रवाहात मराठी माध्यमाच्या शाळांशी आणि मातृभाषेशी असलेले नाते तुटू नये, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. ‘इंग्रजी शिका, जगाशी जोडा; पण मराठी जपा, आपल्या मातीशी नाते जोडा!’ या विचारातून नागरिकांना मातृभाषेचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी नागरिक उपस्थित होते. मराठी शाळांचे संवर्धन काळाची गरज गणेश विसर्जनाच्या आनंदोत्सवाला सामाजिक आणि शैक्षणिक आशयाची जोड देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या चर्चेचा विषय ठरला. या उपक्रमातून मराठी शाळांचे महत्त्व, मातृभाषेचे संस्कार आणि आपल्या मातीशी असलेले नाते जपण्याचा संदेश देण्यात आला. शालेय गणवेशातील विद्यार्थ्यांचे ढोलवादन, महाराष्ट्र गीत, सामूहिक प्रतिज्ञा आणि शाळेच्या घंटेने झालेली सुरुवात यामुळे ‘माझी हरवलेली मराठी शाळा’ हा उपक्रम मिरवणुकीतील विशेष आकर्षण ठरला.
Source link
ढोल-ताशांच्या गजरात मराठी भाषेचा जागर:सावेडीत गणवेशातील ढोलवादकांनी दिला मराठी शाळा संवर्धनाचा संदेश