Headlines

गडचिरोली:छत्तीसगडच्या पावसाचा भामरागडला मोठा फटका




छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका दक्षिण गडचिरोलीतील भामरागड तालुक्याला बसला. छत्तीसगडमधील पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली, तर पर्लकोटा नदीच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ झाली. परिणामी भामरागड परिसरात पूरस्थिती निर्माण होऊन अनेक सखल भाग पाण्याखाली गेले. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने ५२५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. दरम्यान, पाणी ओसरू लागल्याने शनिवारी परिस्थितीत काहीशी सुधारणा झाली. पूरस्थितीमुळे पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने भामरागडचा संपर्क काही काळ प्रभावित झाला. पुलावरून पाणी वाहत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन्ही बाजूंना पोलिस बंदोबस्त तैनात करून बॅरिकेडिंग केले. नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांवर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले. पूरस्थिती निर्माण होताच जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार किशोर बागडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक प्रशासनाने काल दुपारपासून रात्री उशिरापर्यंत बचाव व स्थलांतराची कार्यवाही केली. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत बाधित भागातील ५२५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. पाणी ओसरत असले तरी इंद्रावती व पर्लकोटा नदीकाठच्या तसेच सखल आणि पूरप्रवण भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, पाण्याच्या प्रवाहात उतरू नये आणि पाणी वाहत असलेल्या मार्गावरून प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ५२५ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले दोन गंभीर रुग्णांना बोटीने पर्लकोटा नदी पार करून हेमलकसा येथे सुरक्षितपणे पोहोचवले पूरस्थितीत गंभीर रुग्णांच्या उपचारात अडथळा येऊ नये यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) पथकाने दोन गंभीर रुग्णांना बोटीच्या साहाय्याने पर्लकोटा नदी पार करून हेमलकसा येथे सुरक्षितपणे पोहोचवले. तेथून रुग्णवाहिकेने त्यांना पुढील उपचारासाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले. दरम्यान, बिनागोंडा आश्रमशाळेतील एका आजारी विद्यार्थिनीची प्रकृती बिघडल्याने तिलाही एसडीआरएफच्या मदतीने गुंडेनूर नाला ओलांडून लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *