![]()
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ३ वर्षांच्या चिमुकलीवर झालेला अत्याचार आणि त्यानंतर केलेल्या हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील तपासाला आता वेग आला असून पोलिसांनी मंगळवारी मृताच्या नातेवाइकांचे जबाब फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ नुसार नोंदवले आहेत. दरम्यान, पीडितेच्या शवविच्छेदन अहवालातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून तिचा मृत्यू गळा दाबल्यामुळे गुदमरून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नसरापूर परिसरात राहणाऱ्या एका ३ वर्षीय बालिकेला ६५ वर्षीय आरोपी भीमराव कांबळे याने गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या अमानवी कृत्यानंतर आरोपीने तिची हत्या केली. याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, बलात्कार आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मृत मुलीचे नातेवाईक व कुटुंबीयांचे नोंदवले जबाब पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, चिमुकलीचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार, मुलीचा गळा दाबल्याने श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला आणि गुदमरून तिचा मृत्यू झाला. इतकेच नव्हे तर तिच्या शरीरावर खरचटल्याच्या आणि मुका मार लागल्याच्या अनेक खुणा आढळून आल्या आहेत. याचाही आता तपास करण्यात येणार आहे. घटनेनंतर एसआयटीमार्फत होणार आता सखोल चौकशी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक गिल यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. पोलिस निरीक्षक विजयमाला पवार याबाबत तपास करत आहेत. पोलिसांनी पीडित मुलीची आजी आणि आई-वडील यांचे न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर १६४ नुसार जबाब नोंदवले आहेत. याशिवाय आणखी काही महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस करतायत तांत्रिक आणि वैद्यकीय पुरावे गोळा आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिस तांत्रिक आणि वैद्यकीय पुरावे गोळा करत आहेत. “आम्ही केवळ प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावर अवलंबून न राहता सायंटिफिक आणि तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर भर देत आहोत. आरोपीविरुद्ध भक्कम केस तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे,’ असे अधीक्षक गिल यांनी स्पष्ट केले. या घटनेच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनांनी पोलिस प्रशासनाला निवेदने देऊन आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. नवले पूल परिसरामध्ये आंदोलनाला घातली बंदी मुंबई-बेंगळुरू बाह्य वळण मार्गावरील नवले पूल परिसरात आंदोलन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी याबाबतचे आदेश दिले. नसरापूर अत्याचार प्रकरणानंतर संतप्त नागरिकांनी मुंबई-बेंगळुरू बाह्य वळण मार्गावरील नवले पूल परिसरात शनिवारी (२ मे) सायंकाळी आंदोलन केले. आंदोलनामुळे या भागातील वाहतूक ठप्प झाली. मुंबई तसेच साताऱ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
Source link
नसरापूर प्रकरण:तीन वर्षीय बालिकेचा गुदमरून मृत्यू झाल्याचे अहवालात स्पष्ट, आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, बलात्कार आणि पोक्सोनुसार गुन्हा