![]()
पैठण तालुक्यातील ७४ जळगाव फाटा येथील विष्णू बबन मोरे (३४) याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला तब्बल दीड महिन्यानंतर खुनाचे वळण मिळाले आहे. जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी विष्णूची लाकडी दांड्याने डोक्यात वार करून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून, बिडकीन पोलिसांनी याप्रकरणी संशयित आरोपीला अटक केली आहे. ढाकेफळ येथील विष्णू मोरे हा २१ मार्च २०२६ रोजी रात्री ७४ जळगाव फाटा येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये असताना ही घटना घडली. फिर्यादी पद्माबाई मोरे (६५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गावातीलच वैभव आप्पासाहेब काळे (२४) याने जुन्या भांडणाची कुरापत काढून विष्णूच्या डोक्यात लाकडी दांड्याने गंभीर प्रहार केले. या हल्ल्यात विष्णूचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा मृत्यू अवैध दारूशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात होता, परंतु कुटुंबाने घातपाताचा आरोप लावून धरला होता. त्यानुसार ६ मे रोजी रात्री साडेअकरा वाजता खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपी वैभव काळे याला बुधवारी त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश शेळके यांनी सांगितले.
Source link
जुन्या वादातून मित्राचा खून; जळगावच्या खुनाचा उलगडा:बिडकीन ठाण्यात गुन्हा, दीड महिन्यानंतर आरोपीस अटक