Headlines

भिडेवाडा स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करणार:मंत्री अतुल सावे यांची घोषणा, महात्मा फुले जयंतीनिमित्त उपक्रम




महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर, भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केली. मंत्री सावे यांनी भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर, अधीक्षक अभियंता बिपिन शिंदे, महात्मा फुले स्मारक रहिवाशी कृती समितीचे अध्यक्ष निलेश गिरमे, पीएमपीएल संचालक तथा नगरसेवक अजय खेडेकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. सावे यांनी सांगितले की, क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती नागरिकांना व्हावी, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या विकासाचे काम सुरू करण्यात आले होते. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून स्मारकाचे काम वेगाने सुरू असून, ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यांनी कामाबद्दल समाधान व्यक्त करत उर्वरित विकास कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त नायर यांनी पुणे महानगरपालिकेच्या वतीने भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक विकास आराखड्याच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामांबाबत माहिती दिली. या स्मारकामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित विविध आधुनिक सुविधा उपलब्ध असतील. यामध्ये ऑडिओ-व्हिडिओ शो, दोन्ही महापुरुषांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘थीम बेस्ड’ ऑडिओ-व्हिडिओ शो आणि होलोग्राफीचे काम करण्यात येणार आहे. तसेच, या दोन्ही महापुरुषांचे अर्धपुतळे आणि त्यांच्या कार्याची माहिती प्रदर्शित केली जाईल. मुली आणि महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र, मार्गदर्शन केंद्र आणि संगणक केंद्र उभारले जाणार आहे. या स्मारकात एक ॲम्फीथिएटर देखील असणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *