![]()
वेरूळ इस्रायलचे वाणिज्य दूत यानिव रेव्हाच यांनी सोमवारी जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणी तसेच बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर येथे भेट देत भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे मनापासून कौतुक केले. ‘इतिहास, अध्यात्म आणि स्थापत्यकलेचा अद्भुत संगम येथे अनुभवायला मिळतो. हजारो वर्षांपूर्वी उभारलेल्या या वास्तू आजही जगाला प्रेरणा देणाऱ्या आहेत,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यानिव रेव्हाच यांनी सकाळी सर्वप्रथम वेरूळ लेणी परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी विशेषतः प्रसिद्ध कैलास मंदिर अर्थात लेणी क्रमांक १६ मधील भव्य कोरीव शिल्पकलेचे बारकाईने निरीक्षण केले. एका अखंड दगडातून साकारण्यात आलेल्या या वास्तूचे त्यांनी विशेष कौतुक करत भारतीय शिल्पकलेच्या कौशल्याला सलाम केला. याशिवाय त्यांनी विश्वकर्मा लेणी (क्रमांक १०), बौद्ध लेणी (क्रमांक १२), इंद्रसभा, जगन्नाथ सभा आणि जैन लेणी परिसरालाही भेट देत तेथील धार्मिक, सांस्कृतिक आणि स्थापत्य वैशिष्ट्यांची माहिती जाणून घेतली. लेण्यांमधील सूक्ष्म कलाकुसर, दगडांवर कोरलेली विविध शिल्पे, प्राचीन काळातील वास्तुरचना आणि विविध धर्मांच्या एकात्मतेचे दर्शन घडवणारी रचना पाहून ते विशेष प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय इतिहास आणि संस्कृतीची भव्यता प्रत्यक्ष अनुभवण्याची ही अविस्मरणीय संधी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी संरक्षक सहायक संजय रोहनकर, पोलीस निरीक्षक रेखा लोंढे, उपनिरीक्षक आयुब पठाण, बापू डोंबळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रफिक पठाण, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर कोळी, खुशाल पाटील, महेश घुगे, शरद बचाव, एस. नीळ, योगेश जाधव आणि बाबासाहेब आढाव आदी उपस्थित होते. इस्रायलचे वाणिज्य दूत यानिव रेव्हाच यांनी श्री घृष्णेश्वर मंदिर येथे भेट देत दर्शन घेतले. श्री घृष्णेश्वर मंदिरात विधिवत पंचामृत अभिषेक, मंदिर इतिहासाची घेतली माहिती त्यांनी श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात जाऊन विधीवत पंचामृत अभिषेक केला व दर्शन घेतले. भारतीय संस्कृतीमध्ये अध्यात्माला असलेले महत्त्व आणि मंदिरांच्या माध्यमातून जपली गेलेली परंपरा जगासाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले. इतिहास अभ्यासक भरत जोशी यांनी त्यांना वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिराचा इतिहास, स्थापत्य वैशिष्ट्ये तसेच सांस्कृतिक परंपरेविषयी सविस्तर माहिती दिली.
Source link
वेरूळ लेणीमधील शिल्पकला पाहून इस्रायलचे वाणिज्य दूत प्रभावित