मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने आंदोलनासाठी निघाले असताना त्यांच्यावर टीकेची धारही वाढली आहे. मराठा आरक्षणाचे अभ्यासक अजय बारसकर यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर आणि मुंबईकडे जाण्याच्या निर
.
बारसकर यांनी जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका करत त्यांच्यावर “चालबाज”, “बंडलबाज” आणि “भंपक” असल्याचा आरोप केला. तसेच जरांगे यांच्या आंदोलनात नाट्यमयता असल्याचे म्हणत त्यांनी त्यांची तुलना अभिनयाशी केली. “कधी जोश, कधी हसवणं, कधी रडवणं”, अशा शब्दांत बारसकर यांनी जरांगे यांच्या आंदोलनाच्या शैलीवर निशाणा साधला.
आधी न बोलवता लोक यायचे, आता भीक मागण्याची वेळ आली
मनोज जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदांमध्ये लोकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले जात असल्याचा संदर्भ देत अजय बारसकर यांनी त्यांच्यावर टीका केली. त्यांच्या मते, यापूर्वी जरांगे यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत होता. लोक स्वतःहून आंदोलनात सहभागी होत होते. मात्र, आता परिस्थिती बदलली असून लोकांना आंदोलनासाठी आवाहन करण्याची वेळ जरांगे यांच्यावर आली आहे, असा दावा त्यांनी केला.
बारसकर म्हणाले की, पूर्वी जरांगे यांचा मोठा दरारा होता आणि लोक त्यांच्या एका आवाहनावर एकत्र येत होते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. जरांगे यांच्या भूमिकेतील विसंगती लोकांच्या लक्षात आल्याचा दावा करत त्यांनी त्यांच्या आंदोलनाच्या प्रभावावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मुंबईला जाण्याचा मार्ग का बदलला?
मनोज जरांगे पाटील यांच्या यंदाच्या मुंबई आंदोलनाच्या मार्गात बदल करण्यात आल्याचा मुद्दा अजय बारसकर यांनी उपस्थित केला. पूर्वी ज्या मार्गाने आंदोलन मुंबईच्या दिशेने गेले होते, त्या मार्गावर यावेळी अपेक्षित गर्दी होणार नसल्याची माहिती जरांगे यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी मार्ग बदलल्याचा दावा बारसकर यांनी केला. “आधी ज्या मार्गाने गेले, त्या मार्गावर आता लोक येणार नाहीत, हे त्यांना कळले आहे. त्यामुळे मार्ग बदलला,” असा दावा त्यांनी केला. जरांगे पाटील यापूर्वीही मुंबईच्या दिशेने आंदोलन घेऊन गेले होते. मात्र, त्यातून नेमकं काय साध्य झालं, असा सवाल बारसकर यांनी उपस्थित केला. “तीन वेळा मुंबईकडे गेलो, काय मिळालं?” असा प्रश्न त्यांनी विचारला.
विशेष म्हणजे, जरांगे पाटील नेमक्या कोणत्या उद्देशाने मुंबईला जात आहेत आणि त्यांच्या आंदोलनातून कोणती मागणी पूर्ण करून घ्यायची आहे, हे स्पष्टपणे सांगितले जात नसल्याचेही बारसकर यांनी म्हटले. दीड तास पत्रकार परिषद घेऊनही मुंबईला जाण्याचे अंतिम उद्दिष्ट स्पष्ट होत नसल्याचा दावा त्यांनी केला.
‘जरांगेंनी मराठा समाजाचं मोठं नुकसान केलं’
अजय बारसकर यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचे नुकसान झाल्याचा गंभीर आरोप केला. मराठा समाजातील काही घटक जरांगे यांच्या मागे उभे असले तरी संपूर्ण समाज त्यांच्या भूमिकेशी सहमत नाही, असा दावा त्यांनी केला. बारसकर यांच्या मते, जरांगे यांच्याकडे सरकारकडे नेमकं काय मागायचं, याबाबत स्पष्टता नाही. केवळ रोष व्यक्त करून प्रश्न सुटत नाही. मराठा समाजाला आधीपासून उपलब्ध असलेल्या आरक्षणाच्या पर्यायांचाही विचार करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी म्हणून ओबीसी दाखले मिळण्याच्या मुद्द्याचा तसेच इतर उपलब्ध आरक्षणाच्या पर्यायांचा संदर्भ देत त्यांनी जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. जरांगे यांच्यासोबत पूर्वीच्या तुलनेत आता कमी लोक येतील आणि आंदोलनातील गर्दीही कमी होऊ शकते, असा अंदाज बारसकर यांनी व्यक्त केला.
सरकारने दूध पाजून जरांगेंना मोठं केलं
मनोज जरांगे पाटील यांच्या आर्थिक व्यवहारांबाबतही अजय बारसकर यांनी अनेक गंभीर आरोप केले. जरांगे यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर पैसा कुठून आला, त्यांच्या वाहनांचा खर्च कोण करतो, तसेच त्यांच्या उपचारांवरील खर्चाचा स्रोत काय आहे, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. जरांगे यांना ईडीकडून नोटीस का आली, असा प्रश्न उपस्थित करत बारसकर यांनी त्यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी व्हावी, अशी भूमिका मांडली. सरकारमधील काही लोकांनी जरांगे यांना सुरुवातीपासूनच पाठबळ दिल्याचा आरोपही बारसकर यांनी केला. सत्ताधारी आणि महाविकास आघाडीतील नेते वेगवेगळ्या वेळी जरांगे यांच्या आंदोलनाला मदत करत असल्याचा दावा त्यांनी केला.
जरांगे नेमकं काय मागतात ते कागदावर लिहून द्यावं
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत स्पष्टता असावी, अशी मागणीही अजय बारसकर यांनी केली. जरांगे यांनी नेमकं काय हवं आहे, कोणत्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात आणि त्या मागण्यांची कायदेशीर व घटनात्मक चौकट काय आहे, हे स्पष्टपणे मांडावे, असे ते म्हणाले. “जरांगे पाटील यांना काय पाहिजे आहे, ते कागदावर लिहून द्यावं. मी मध्यस्थी करतो,” अशी भूमिका बारसकर यांनी मांडली. त्यांच्या मते, सरकारसमोर ज्या मागण्या मांडल्या जात आहेत, त्यातील काही मागण्या प्रत्यक्षात पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे आंदोलन करूनही अंतिम तोडगा निघणार नाही, असा दावा त्यांनी केला.
ब्रह्मदेव जरी आला तरी मागणी पूर्ण होणार नाही
मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर टीका करताना अजय बारसकर यांनी अत्यंत टोकाची भूमिका मांडली. सरकारला काही मागण्यांबाबत एकतर होकार द्यावा लागेल किंवा नकार. मात्र, जरांगे करत असलेल्या काही मागण्या कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होऊ शकत नाहीत, असा दावा त्यांनी केला. “ब्रह्मदेव जरी खाली आला तरी मनोज जरांगे जे मागत आहेत ते मिळणार नाही,” अशा शब्दांत बारसकर यांनी आपली भूमिका मांडली.
त्याचबरोबर जरांगे यांच्यावर “चालबाज” असल्याचा आरोप करत त्यांनी आंदोलनाच्या गर्दीबाबतही गंभीर दावा केला. गर्दी झाली तर मुंबईच्या दिशेने आंदोलन सुरू ठेवायचे आणि अपेक्षित गर्दी झाली नाही तर रुग्णालयात दाखल व्हायचे, अशी भूमिका जरांगे घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.
आरोप-प्रत्यारोपांमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. एका बाजूला जरांगे पाटील आपल्या मागण्यांसाठी मोठ्या संख्येने मराठा समाजाला मुंबईत एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या आंदोलनाच्या पद्धतीवर आणि मागण्यांच्या व्यवहार्यतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अजय बारसकर यांनी केलेल्या आरोपांमुळे या आंदोलनाला आता राजकीय आणि सामाजिक वादाची आणखी एक किनार मिळाली आहे. मात्र, बारसकर यांनी केलेल्या आर्थिक व्यवहारांसह इतर गंभीर आरोपांवर मनोज जरांगे पाटील किंवा त्यांच्या समर्थकांची भूमिका काय आहे, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. मुंबईकडे निघालेल्या या आंदोलनाला प्रत्यक्षात किती प्रतिसाद मिळतो, सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये कोणती चर्चा होते आणि मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर पुढे काय तोडगा निघतो, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा…
मनोज जरांगेंचा एल्गार, 15 सप्टेंबरला मुंबईकडे कूच करणार: पाटोदा-खोपोलीमार्गे थेट आझाद मैदानात आमरण उपोषण; मार्ग जाहीर करताना जरांगे भावुक

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आणि सगेसोयरे तसेच कुणबी प्रमाणपत्रांच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा ‘चलो मुंबई’चा नारा दिला आहे. आपल्या आमरण उपोषणाच्या 15व्या दिवशी अंतरवाली सराटी येथे झालेल्या राज्यव्यापी बैठकीत त्यांनी मुंबईला जाण्याचा सविस्तर मार्ग, मुक्काम आणि आंदोलनाची संपूर्ण रणनीती जाहीर केली. “ही मराठ्यांची अंतिम आणि निर्णायक लढाई असून, आपण शांततेच्या मार्गाने मुंबईत जाऊन जिंकूनच माघारी येणार आहोत,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. येथे वाचा संपूर्ण बातमी