सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी यांनी दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल करत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर मारहाणीचे गंभीर आरोप केले असून तातडीने अटक करण्याची मागणी केली
.
मारहाणीचे गंभीर आरोप
फैजान अन्सारी यांनी दिल्लीच्या डीसीपी कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे अभिजीत दिपके यांच्या सहकाऱ्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी आधीच दोन गुन्हे दाखल असल्याचा दावा करत, दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दिपकेंवर गंभीर आरोप
प्रसारमाध्यमांशी बोलताना अन्सारी म्हणाले, “माझ्याकडे पुरावे आहेत की, अभिजीत दिपके यांच्या लोकांनी माझ्यावर पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे हल्ला केला. या संदर्भात दोन गुन्हे आधीच नोंद आहेत. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी तात्काळ कारवाई करून दिपके यांना अटक करावी.” तसेच त्यांनी दिल्ली पोलिस आणि दिल्ली सरकारचे कौतुक करत, “सोनम वांगचुक यांना योग्य वेळी ताब्यात घेतल्यामुळे दिल्लीतील वातावरण बिघडण्यापासून वाचले,” असेही म्हटले. अभिजीत दिपके हे केवळ स्वतःच्या फायद्यासाठी आंदोलन करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
आर्थिक व्यवहारांबाबतही प्रश्नचिन्ह
दरम्यान, यापूर्वी सुरतमधील आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनीही अभिजीत दिपके यांच्या कुटुंबाच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली होती. कनिष्ठ अभियंता असलेल्या भगवंतराव दिपके यांच्या उत्पन्नातून अमेरिकेतील उच्च शिक्षणाचा खर्च कसा झाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी जाहीर केलेल्या एक कोटी रुपयांच्या निधीबाबत आणि सीजेपीच्या कायदेशीर स्थितीबाबतही निवडणूक आयोग आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाकडे तक्रार करण्यात आली आहे.
आंदोलनाचा इशाराही कायम
दुसरीकडे, अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकारने मागण्या पूर्ण न केल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. नीट-यूजी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना जाहीर केलेली एक कोटी रुपयांची मदत अद्याप मिळालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जंतर-मंतर येथे ३७ दिवस आंदोलन केल्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि इतर मागण्यांबाबत आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते.
हेही वाचा..
आधी पंतप्रधानांनी डिग्री दाखवावी:मग मी माझे कागदपत्रे दाखवेन, वडिलांवरील तक्रारीवरून अभिजित दिपकेंचा पलटवार; 5 तारखेला CJP ची बैठक

कॉकरोच जनता पार्टीची पुढील दिशा आणि अजेंडा ठरवण्यासाठी येत्या 5 तारखेला पक्षाच्या कोअर कमिटीची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. तत्पूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली आहे. आपल्या वडिलांविरोधात झालेल्या तक्रारीवरून त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीचा मुद्दा उपस्थित करत सरकारला खुले आव्हान दिले आहे.सविस्तर वाचा