“राज्यात यंदा अस्मानी संकटाने थैमान घातले असून शेतात उभा असलेला खरीप पूर्णपणे जळून खाक झाला आहे. मात्र, सरकारचे मंत्री गळ्यात लांबलचक टाय, डोळ्यांवर महागडे चष्मे आणि अत्तराचे घमघमाट मारून दुष्काळी बांधावर येत आहेत. मंत्र्यांचे हे दौरे म्हणजे शेतकऱ्या
.
पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील भीषण दुष्काळ, निकृष्ट पंचनामे, एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन, शिक्षक भरतीतील मराठवाड्याची उपेक्षा आणि आपल्यावर होणाऱ्या अंतर्गत राजकीय आरोपांवर सविस्तर आणि परखड भाष्य केले.
पंचनाम्यांच्या नावाखाली क्रूर चेष्टा; ‘जळत जाणारे पीक’ धरून 1 लाख रुपये द्या!
दुष्काळाची दाहकता मांडताना जरांगे पाटील म्हणाले, “अधिकारी पाच एकराच्या शेतात जातात आणि अलीकडचा कोपरा जळाला म्हणून पाच टक्क्यांचा अहवाल देतात. अरे बाबा, शेतात पाणीच नाही, आभाळात पाऊस नाही, तर पलीकडचा कोपरा जळणार नाही का? फळबागा असोत, ऊस असो, कापूस असो की सोयाबीन; पाणी नसल्याने सगळे जळून खाक होणार आहे. त्यामुळे ‘जळत जळत जाणारे पीक’ असा निकष लावून सरकारने सरसकट दुष्काळ जाहीर करावा.”
गावांतच चारा छावण्या सुरू करा
“50 किलोमीटर अंतरावर चारा छावण्या टाकल्या तर 100 गावांतील शेतकरी जनावरे घेऊन तिथे कसा जाणार? घर उघडे पडल्यावर चोऱ्या होतात, गावात म्हातारे-कोतारे आजारी पडले तर दवाखान्यात न्यायला कोणी उरत नाही. सरकारने प्रत्येक गावातच जनावरांसाठी चारा आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले पाहिजे.”

सरसकट कर्जमाफी व पीक विमा
“शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची वाट बघू नका. उद्योगपतींचे हजारो कोटी माफ करता, मग शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करायला हात का आखडतात? तीन-तीन वर्षांपासून पीक विम्याचे पैसे कंपन्यांनी अडवून ठेवले आहेत, पूरग्रस्त अनुदाने रखडली आहेत; सरकारने हेक्टरी 1 लाख रुपये मदत दिलीच पाहिजे.”
आत्महत्या करू नका; आपली किंमत दीड लाख रुपये नाही!
हताश झालेल्या शेतकऱ्यांना भावनिक साद घालत ते म्हणाले, “दोन दिवस उपाशी राहण्याची वेळ आली तरी खचून जाऊ नका; पण कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या करू नका. शेतकरी मेला की सरकार त्याच्या कुटुंबाला केवळ दीड लाख रुपये देते. नेता पांढरे कपडे घालून चेक देताना 100 फोटो काढतो आणि फोटो चांगला आला का ते बघतो! आपल्या घरात सालगडी ठेवला तरी वर्षाला दोन लाख रुपये द्यावे लागतात; 20 वर्षांत त्याला 40 लाख होतात. मग आपली आयुष्यभराची किंमत फक्त दीड लाख रुपये आहे का? सावध व्हा, निर्भीड व्हा; एकत्र येऊन हक्कासाठी लढा.”
MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन; राजीनामा तत्काळ स्वीकारा!
पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बोलताना त्यांनी सरकारला सुनावले. “एमपीएससीच्या अध्यक्षांनी जर मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला असेल, तर तो सरकारने तत्काळ स्वीकारायला हवा. देशात काय एकच माणूस हुशार आहे का? दुसरा सक्षम माणूस त्या पदावर बसवा. विद्यार्थ्यांच्या आक्रोशाची दखल घेतली नाही तर मोठा उद्रेक होईल.”
मराठवाड्यात शिक्षक भरतीचा पर्यायच नाही
“घरात शेतात काही पिकलं नाही तर पोरगं नोकरीला लागेल ही बापाची आशा असते. पण इथे जागा रिक्त असून भरल्या जात नाहीत. मराठवाड्यात तर शिक्षक भरतीचा पर्यायच ठेवलेला नाही. हा कोणता शिक्षण विभाग आणि कसा कारभार चालवला आहे?”
माझ्यावर आरोप करायला सरकारी माणसे उभी केली!
आंदोलनातील जवळच्या सहकाऱ्यांच्या नाराजीवर आणि आरोपांवर त्यांनी स्पष्टीकरण दिले. “गेल्या 15 दिवसांत माझ्या जवळचे काही लोक फुटले. पण हे सरकारचे षड्यंत्र आहे. मी मॅनेज होत नाही, वाकत नाही म्हणून माझ्याच माणसांना हाताशी धरून माझ्यावर खोटे आरोप करवले जात आहेत. दसऱ्यानंतर बोलण्यासाठी काही विशेष टीम तयार केल्या जात असल्याची माहिती माझ्या कानावर आली आहे. पण मला एकटे पाडता येणार नाही; गावागावातील सामान्य मराठा आणि गरीब जनता माझ्या पाठीशी खंबीर आहे.”
“आंतरवालीच्या काही भगिनींनी आरोप केले असतील, तरी मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. शेवटी त्या आपल्या समाजाच्या भगिनी आहेत. माझ्या समर्थकांनी आणि तरुणांनीही कोणत्याही महिलेबद्दल किंवा भगिनीबद्दल बोलताना पूर्ण भान आणि संयम राखला पाहिजे. आज नाही तर उद्या प्रत्येकाला पश्चात्ताप होईल की आपण समाजाच्या आंदोलनाविरुद्ध नको बोलायला होते.”
आरक्षणासाठी सरकारला 3 महिन्यांची मुदत दिली आहे
मराठा आरक्षणाच्या लढ्याविषयी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “आरक्षणाचा लढा अत्यंत क्लिष्ट आणि मोठा आहे. आम्ही सरकारला जाहीरपणे 3 महिन्यांची मुदत दिलेली आहे. मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळाने पाटोद्यात दिलेला शब्द सरकार पूर्ण करेल, अशी मला 100 टक्के खात्री आहे. सरकारने मराठा समाजाचा रोष पुन्हा अंगावर घेऊ नये. जर शब्द पाळला नाही, तर पुढील निर्णय समाज एकत्र येऊन घेईल,” असा सज्जड इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
——————————————
हेही वाचा…
तातडीने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवा!: नाना पटोलेंची मागणी, म्हणाले- 1972 पेक्षाही महाभीषण दुष्काळ, धरणांवर पहारा हे उशिरा सुचलेले शहाणपण

“राज्यात यंदा 1972 पेक्षाही अधिक भयानक आणि दाहक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विधानसभेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी ‘अल निनो’चा इशारा दिला होता; तरीही शेतकऱ्यांना महागडी खते, बनावट बियाणे विकून आधी लुटले आणि आता उभी पिके जळत असताना धरणांवर पोलीस बंदोबस्त लावून पहारा बसवला जात आहे. धरणांवर पोलीस बसवणे हे फडणवीस-बावनकुळे सरकारचे उशिरा सुचलेले शहाणपण आहे,” अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केली. येथे वाचा संपूर्ण बातमी