![]()
रायगड जिल्ह्यातील केंद्रीय वस्तू व सेवा कर (CGST) विभागात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई करत भ्रष्टाचाराचे एक मोठे प्रकरण उघडकीस आणले आहे. एका दगडखाणी व्यवसायाशी संबंधित प्रकरण निकाली काढण्यासाठी तब्बल 40 लाख रुपयांची लाच स्वीकारताना सीब
.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, एका दगड उत्खनन कंपनीचे जीएसटी आणि रॉयल्टीशी संबंधित प्रलंबित प्रकरण बंद करण्याच्या मोबदल्यात या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला तब्बल 1 कोटी 50 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तक्रारदारासोबत झालेल्या चर्चेअंती तडजोड होऊन ही लाचेची रक्कम 40 लाख रुपयांवर निश्चित करण्यात आली होती.
मध्यस्थाला रंगेहाथ पकडले
लाचेची ही मोठी रक्कम सरकारी अधिकाऱ्यांनी स्वतः न स्वीकारता नरेंद्र राजपूत या खासगी मध्यस्थाकडे देण्यास सांगितले होते. त्यानुसार सीबीआयने 27 ऑगस्ट रोजी सापळा रचून या मध्यस्थाला 40 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्या अटकेनंतर केलेल्या कसून तपासात अधीक्षक आणि अतिरिक्त आयुक्तांचा या गुन्ह्यातील थेट सहभाग निष्पन्न झाला आणि त्यांनी लाच स्वीकारल्याची कबुली दिल्यानंतर त्यांनाही तात्काळ बेड्या ठोकण्यात आल्या.
अटक करण्यात आलेले आरोपी
या धडक कारवाईत सीबीआयने एकूण तीन जणांना अटक केली आहे. यामध्ये केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे अतिरिक्त आयुक्त विनय कुमार कांठेती, रायगड सीजीएसटी विभागाचे अधीक्षक राकेश कुमार सिन्हा आणि लाचेची रक्कम स्वीकारणारा खासगी मध्यस्थ नरेंद्र राजपूत यांचा समावेश आहे.
छापेमारीत घबाड हाती
अटकेच्या या कारवाईनंतर सीबीआयच्या पथकाने आरोपींच्या निवासस्थानांवर आणि त्यांच्याशी संबंधित इतर ठिकाणांवर सखोल झाडाझडती घेतली. या छापेमारीदरम्यान अधिकाऱ्यांना 43 लाख रुपयांची रोख रक्कम आणि तब्बल 90 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आढळून आले असून, ही सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यासाठी सीबीआयकडून पुढील तपास वेगाने सुरू आहे.