“मी कोणाची लेक आहे हे विसरू नका, मी वास्तवतेत जगते. शरद पवार यांची गेल्या 40 वर्षांतील वक्तव्ये काढून पाहा; राज्यात ज्याच्याकडे ‘मॅजिक नंबर’ असतो, तोच मुख्यमंत्री होऊ शकतो. एखाद्याने काहीतरी बालिश लिहिले म्हणून मी अशा ‘गॉसिप’मध्ये वेळ घालवणार नाही,”
.
4 जेपीसी आणि ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर कोणी का विचारत नाही?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होत असतील तर चांगली गोष्ट आहे, असे विधान संजय राऊत यांनी केले होते. त्यावर सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी कोणाची लेक आहे हे विसरू नका आणि मी वास्तवात जगणारी व्यक्ती आहे. ज्यांच्याकडे विधानसभेत बहुमताचा ‘मॅजिक नंबर’ आहे, तोच मुख्यमंत्री होतो. बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने मला गॉसिप करण्यासाठी नव्हे, तर काम करण्यासाठी आणि धोरणनिर्मितीसाठी (पॉलिसी मेकिंग) दिल्लीला पाठवले आहे.
गोविंदराव तळवळकरांच्या अग्रलेखांची आठवण
मी सध्या 4 संयुक्त संसदीय समित्यांवर (JPC) आणि संसदेच्या वित्तीय समितीवर (फायनान्स कमिटी) काम करत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नवे टॅरिफ (आयात शुल्क) लावणार आहेत, त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होणार, याबद्दल मला कोणीच विचारत नाही. मी लहानाची मोठी पत्रकारितेच्या वातावरणात झाली; गोविंदराव तळवळकरांचे अग्रलेख वाचून आम्ही घडलो. त्यांनी कधी गॉसिप केले नाही, तर आमच्या धोरणांवर दिलखुलास टीका केली.

पुणे गुन्हेगारीत नंबर 1 वर असल्याचा अमित शहांचाच डेटा
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर झालेला गोळीबार व हत्या आणि खंडणीसाठी झालेल्या गोळीबाराच्या घटनांवर सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साद घातली. माझ्या 20 वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात मी कधीही कोणावर वैयक्तिक आरोप केलेले नाहीत. महाराष्ट्राचे पोलीस अतिशय उत्तम आहेत आणि ते शेतकऱ्यांचीच मुले आहेत; मात्र त्यांच्यावर बसलेल्या प्रशासकांनी आता उत्तरदायित्व घेतले पाहिजे.
केंद्रीय गृह मंत्रालयाचा हवाला
हा माझा स्वतःचा डेटा नाही, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या गृह मंत्रालयाचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या बाबतीत पुणे शहर 1 नंबरवर आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे डबल इंजिन सरकार आहे. पुण्यात बारामती आणि शिरूर (खासदार अमोल कोल्हे) हे 2 लोकसभा मतदारसंघ आमच्याकडे आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर जसे आम्ही देशातील 50 खासदार जगभरात भारताची बाजू मांडण्यासाठी गेलो, तसेच पुण्याच्या सुरक्षिततेसाठी आम्ही राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करू. कालच मी मुख्यमंत्र्यांना ट्वीट करून व संपर्क साधून यावर गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली आहे.
संविधान दिनी सत्ताधाऱ्यांना आरसा
आज योगायोगाने संविधान दिन असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगातील सर्वोत्तम समतेचे संविधान दिले. कोलगेट, गोदरेजसारख्या कंपन्यांना जाहिरात फलक लावण्यासाठी पैसे भरावे लागतात, पण राजकीय पक्ष आणि सत्ताधारी नियम पाळत नाहीत. शाळेच्या प्रिन्सिपलनेच चूक करायला सुरुवात केली, तर शाळेला शिस्त कशी लागणार, असा टोलाही त्यांनी लगावला.
26/11 च्या हल्ल्यात आम्ही 3 ते 4 मित्र गमावले
26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनी सुप्रिया सुळे यांनी त्या काळरात्रीच्या वैयक्तिक आठवणींना उजाळा दिला. 26/11 च्या रात्री मी मुंबईतच होते. माझे बंधू श्रीनिवास पवार, शर्मिला वहिनी आणि स्मृती शिंदे यांच्यासोबत आम्ही जेवण करत असताना हल्ल्याची माहिती मिळाली. आमचे काही मित्र तिथे अडकले होते, त्यांना धीर देण्यासाठी आम्ही गाडीने निघालो; मात्र पोलिसांनी विल्सन कॉलेजजवळ आमची गाडी अडवून पुढे जाण्यास मज्जाव केला. या हल्ल्यात सदानंद सुळे आणि मी आमचे 3 ते 4 जवळचे मित्र गमावले, हा आमच्यासाठी खूप मोठा वैयक्तिक धक्का होता.
18 वर्षे प्रलंबित स्मारक आणि 14 वर्षांपासून थकीत मानधन
या हल्ल्यातील स्मारकाचे काम 18 वर्षांपासून प्रलंबित असून त्यात भ्रष्टाचार झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच, दहशतवादी अजमल कसाबच्या खटल्यातील 2 वकिलांचे मानधन 14 वर्षे उलटूनही सरकारने अद्याप दिलेले नाही, याबाबत कागदपत्रे पाठवल्यास आपण नक्की पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शरद पवारांकडून कधी गप्प बसायचे हे शिकलो नाही तर उपयोग काय?
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर केलेली जहरी टीका आणि अंजली आंबेडकर यांनी ‘भाजपची बी-टीम’ म्हटल्याबद्दल सुळे यांनी शांतपणे उत्तर दिले. सशक्त लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे मत मांडले. मी गेल्या 35 वर्षांपासून शरद पवारांवरील अशी टीका ऐकत आले आहे, त्यामुळे मला यात काही नवीन वाटत नाही. मला बोलण्याची ताकद आहे, तशीच ऐकण्याचीही ताकद ठेवली पाहिजे. शरद पवारांकडून कधी गप्प बसायचे हेच शिकलो नाही, तर मग काय उपयोग?
दुष्काळ आढावा व पक्ष चिन्हाची लढाई
राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांना निधी मिळाला की नाही, याचा डेटा शरद पवार व प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मागवला असून आज मुंबईतील बैठकीत पुढील 1 ते 2 महिन्यांचा कार्यक्रम ठरेल. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या 2 पत्रांची दखल घेत इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या मतदारसंघात काही कामे सुरू झाली आहेत. तसेच, सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेची सुनावणी अंतिम टप्प्यात असून त्यानंतर आमच्या पक्षाची सुनावणी होईल. निवडणूक आयोगात शरद पवारांवर अन्याय झाला असून, त्यांनी स्थापन केलेला पक्ष त्यांना परत मिळेपर्यंत आमची लढाई सुरूच राहील, असेही सुळे यांनी ठामपणे सांगितले.
————————————————————————-
हेही वाचा…
सत्तेत येण्यासाठी भारत-पाकिस्तान युद्धाचा अजेंडा: शरद पवार दाऊद इब्राहिमचे मित्र; मला अनेकांचा इतिहास माहिती- प्रकाश आंबेडकर

देशातील राजकीय पक्ष विकले गेले आहेत. शरद पवार हे दाऊद इब्राहिमचे मित्र आहेत. मी अनेकांचा इतिहास सांगू शकतो; हा सर्व इतिहास आरएसएसच्या लोकांनी स्वतःकडे ठेवला आहे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की, इथल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना एकप्रकारे गुलाम करण्यात आले आहे. त्यामुळे देशाचे संविधानच नाही, तर स्वातंत्र्यसुद्धा धोक्यात आले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी