Headlines

असंख्य दिव्यांनी उजळले श्रीक्षेत्र कौंडण्यपूर:दीपोत्सवाने भाविक मंत्रमुग्ध, वर्धा नदीघाटापासून रुख्मिणी मंदिरापर्यंत दिव्यांची आरास




विदर्भाची राजकन्या श्री रुख्मिणी माता यांचे माहेरघर आणि भगवान श्रीकृष्णाचे सासर म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे अधिकमासानिमित्त एक लाख दिव्यांच्या दीपोत्सवाचे आयोजन केले.या दिव्य सोहळ्याने कौंडण्यपूर नगरी भक्ती आणि प्रकाशाच्या तेजाने उजळून निघाली. भागवताचार्य माउली महाराज सालगावकर यांच्या सात दिवसीय भागवत सप्ताहाचा समारोप या भव्य दीपोत्सवाने झाला. वर्धा नदीच्या घाटापासून थेट श्री रुख्मिणी माता मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत सुमारे एक लाख दिव्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती. भाविकांच्या उपस्थितीत प्रज्वलित झालेल्या दीपमाळांनी परिसरात अलौकिक आणि नयनरम्य वातावरण निर्माण झाले होते. या सोहळ्यासाठी अंबा रुख्मिणी सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष रविराज देशमुख तसेच माजी आमदार दादाराव केचे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे संचालन संजय महाराज ठाकरे यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी दीपोत्सवात सहभागी होत भाविकांना अधिकमासाच्या शुभेच्छा दिल्या.दीपोत्सवानिमित्त मंदिर परिसरात भजन-कीर्तन, हरिनाम संकीर्तन, भागवत सप्ताहातील विविध धार्मिक विधी आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दीपांच्या प्रकाशाने उजळून निघालेला वर्धा नदीघाट आणि मंदिर परिसर पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अधिकमासाच्या पावन पर्वात आयोजित करण्यात आलेल्या या भव्य दीपोत्सवामुळे कौंडण्यपूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात आणखी भर पडली असून, हा अविस्मरणीय सोहळा भाविकांच्या मनात कायमचा घर करून गेला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *