![]()
लासूर स्टेशन येथे आषाढी एकादशीनिमित्त स्वर-शारदा संगीत अकॅडमी व नवतरुण भजनी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विठ्ठल गीती गावा–२०२६’ हा भक्तिमय संगीत सोहळा विश्वकर्मा मंदिरात उत्साहात पार पडला. पंचक्रोशीतील सुमारे ३०० वारकरी व विठ्ठलभक्तांनी या सोहळ्यास उपस्थिती लावली. कार्यक्रमात बालकलाकारांसह भजनी मंडळाच्या सदस्यांनी संतांचे विविध अभंग सुरेल स्वरात सादर केले. संगीत अलंकार प्रा. अण्णासाहेब आढाव यांच्या भावपूर्ण गायनाने उपस्थित भक्त मंत्रमुग्ध झाले. पुणे येथील चैतन्य शिवगंध यांनी पखवाज, तर नागपूर येथील सम्यक रंगारी यांनी तबल्याची उत्कृष्ट साथसंगत केली. कार्यक्रमाचे यूट्यूब लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी रवी चव्हाण, संदीप अमराव, सुनील पाखरे व अमोल जाधव यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात सहभागी बालकलाकार काव्या दाभाडे, हर्षदा परदेशी, स्वराली पठारे, वैष्णवी बोडके, मानवी भुसारे, श्रेयश बडोगे, पूजा परदेशी व त्रिवेणी पवार यांचा नवतरुण भजनी मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किशोर जगताप यांनी केले. सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी नवतरुण भजनी मंडळाचे अशोक राऊत, चांगदेव गायकवाड, नवनाथ सोमवंशी, गणेश सोमवंशी, द्वारकादास आव्हाड, प्रशांत दाभाडे, प्रदीप पठारे, सुनील धनवट, अनिल गायकवाड,बद्रीनाथ बडोगे, मच्छिंद्र बडोगे, राजेंद्र गायकवाड यांच्यासह संगीत अकॅडमीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
Source link
आषाढी एकादशीनिमित्त:लासूरला विठ्ठल नामाच्या गजरात ‘विठ्ठल गीती गावा-2026’ सोहळा