Headlines

एकनाथ शिंदेंच्या सभेपूर्वीच साताऱ्यात वातावरण तापले:शिवसेना शिंदे गटाच्या बॅनरवरून महेश शिंदेंचा फोटो गायब, पक्षविरोधी भूमिकेमुळे कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा




साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेपूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शहरात लावण्यात आलेल्या बॅनर्सवरून शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांचा फोटो गायब असल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीदरम्यान घेतलेल्या पक्षविरोधी भूमिकेमुळे कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा असून, याच रागातून सभेच्या ठिकाणच्या आणि शहरभरातील बॅनर्सवर महेश शिंदेंना स्थान देण्यात आले नसल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात आता तर्कवितर्कांना उधाण आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महेश शिंदे यांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेपासून फारकत घेत भाजपशी हातमिळवणी केल्याचा आणि पत्नी प्रिया शिंदे यांना अध्यक्ष करण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप केला जात आहे. या पक्षविरोधी भूमिकेमुळे शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असून, त्यातूनच बॅनर्सवरून त्यांचे फोटो गायब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, जिल्हाप्रमुख रणजीत भोसले यांनी हा वाद सावरण्याचा प्रयत्न केला असून, बॅनर्सवर फोटो नसणे ही केवळ काही कार्यकर्त्यांकडून चुकून झालेली गोष्ट असल्याचे स्पष्टीकरण देत सारवासारव केली आहे. सोमवारी एकनाथ शिंदे यांची सभा होणार असून त्यांच्या सभेला महेश शिंदे उपस्थित राहणार का, तसेच ते व्यासपीठावर दिसणार का, याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष असणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे शिवसेना शिंदे गटात अंतर्गत मतभेद असल्याचे समोर आले आहे. सातारा जिलहा परिषद निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीला बहुमत असतानाही भाजपने सदस्य फोडून सत्ता मिळवली. या प्रक्रियेत शिवसेना शिंदे गटाचे सदस्य भाजपच्या बाजूने गेल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. तसेच निवडणुकीच्यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की देखील झाली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *