![]()
महाराष्ट्रात विशेष सघन पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेत मसुदा मतदार यादी प्रसिद्धीनंतर ३६ जिल्ह्यांमध्ये नवीन मतदार, आक्षेप आणि नाव, फोटो आदी दुरुस्तीसाठी ६ लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. पुण्यात सर्वाधिक ५६,६०५ अर्ज आले आहेत. मसुदा यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाली. त्यात ९,७८,५४,०४९पैकी ७,७१,६५,५६२ मतदारांचा यादी समावेश करून २,०६,८८,४८७ म्हणजेच २१.१४ टक्के मतदारांची नावे वगळण्यात आली होती. नावे वगळण्याच्या संख्येत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. वगळलेल्यांना पुन्हा नोंदणीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे आयोजित केली होती. राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, ३१ ऑगस्ट ते ४ ऑक्टोबरदरम्यान ६,२४,०५४ अर्ज प्राप्त झाले. यामध्ये ६,०५,०९७ फॉर्म ६ अर्ज (नवीन मतदारांसाठी), तर ११,२५१ फॉर्म ७ अर्ज (मतदार यादीत एखाद्याच्या समावेशावर आक्षेप किंवा आधीच सूचीबद्ध असलेले नाव वगळण्याची विनंती) आणि ७,७०६ फॉर्म ८ अर्ज (मतदार ओळखपत्रातील चूक बदलणे किंवा दुरुस्तीसाठी) यांचा समावेश होता. छत्रपती संभाजीनगरात सुमारे ३ लाख ४३ हजार नावे वगळली गेली. आतापर्यंत २२,८७४ अर्ज प्राप्त झाले. १६ नोव्हेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध होणार दावे आणि आक्षेप १२ ऑक्टोबरपर्यंत दाखल करता येतील. त्यावर १२ नोव्हेंबरपर्यंत कार्यवाही होईल. अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. बूथ अधिकाऱ्यांना व्हॉट्सॲपवर कागदपत्रे स्वीकारण्यास आणि आवश्यकतेनुसार घरोघरी भेटी देण्यास सांगण्यात आले आहे. फॉर्म ६, ७ आणि ८ चा वापर कशासाठी ? फॉर्म ६ : नव्याने मतदार यादीत नाव नोंदणी, नवीन ठिकाणी यादीत नाव समावेशासाठी हा फॉर्म वापरला जातो.
फॉर्म ७ : मतदार यादीतील नावावर आक्षेप घेणे किंवा नाव कायमचे कमी करण्यासाठी. दुबार नाव वगळण्यासाठी.
फॉर्म ८ : नाव, वय, पत्ता, जन्मतारीख, लिंग, नातेवाईकाचे नाव किंवा फोटो आदीत दुरुस्तीसाठी. बीडला पदवीधरच्या प्रारूप यादीत उद्धव ठाकरेंचे नाव बीड | पदवीधर मतदारसंघ प्रारूप मतदार यादीत उद्धव ठाकरेंचे नाव तीन मतदारांच्या नावापुढे जोडल्याचा प्रकार समोर आला. बीड तहसील प्रशासनाने तातडीने चूक दुरुस्त केली. यादीमध्ये एका ठिकाणी ‘ओंकार उद्धव ठाकरे मस्के’ (रा. पालवण) असे नाव नमूद करण्यात आले होते. दुसऱ्या एका मतदाराचे नाव ‘उद्धव ठाकरे खरात’ असे नोंदवले गेले होते. तसेच एका नावामध्ये ‘ऋषिकेश उद्धव ठाकरे उलथापालथ करा’ असे नमूद आहे.
Source link
एसआयआर : राज्यात 2 कोटी नावे कट:दुरुस्तीसाठी केवळ 6.24 लाख अर्ज, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले जिल्हानिहाय आकडे