![]()
एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका ७५ वर्षांच्या वृद्धाला गुंगीकारक औषध मिसळलेले बिस्कीट खाऊ घालून बेशुद्ध करत, त्यांच्या हातातील तीन तोळ्यांच्या सोन्याच्या अंगठ्या लांबवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना २३ एप्रिल २०२६ रोजी घडली असून, तब्बल ६ महिन्यांनंतर अज्ञात चोरट्याविरुद्ध पुण्याच्या संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तो गुन्हा छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. फिर्यादी दादाभाऊ भाऊराव वैद्य (७५, रा. एरंडवणा, पुणे, मूळ रा. गुंडेवाडी, जि. जालना) हे २३ एप्रिल २०२६ रोजी जालन्याहून पुण्याला जाण्यासाठी एसटी बसने निघाले होते. दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास बस छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बसस्थानकात पोहोचली असता, त्यांच्या शेजारी एक अनोळखी व्यक्ती येऊन बसली. प्रवासादरम्यान गप्पा मारत त्याने वैद्य यांना बिस्कीट खाण्याचा आग्रह केला. बिस्कीट खाल्ल्यानंतर थोड्याच वेळात वैद्य यांना तीव्र गुंगी आली व ते बेशुद्ध पडले. याचा फायदा घेऊन भामट्याने त्यांच्या हातातील प्रत्येकी एक तोळा वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या काढून पळ काढला. सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणांचा फायदा चोरट्यांनी पुन्हा एकदा सीसीटीव्ही नसलेली ठिकाणे हेरून गुन्हे करण्याची जुनी पद्धत सुरू केली आहे. गर्दीच्या ठिकाणी किंवा प्रवासात गुंगीचे पदार्थ देऊन दागिने लांबवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, प्रवाशांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
मेंदूवर थेट आघात गुंगीकारक औषधामुळे थेट मज्जासंस्थेवर परिणाम होऊन मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. यामुळे रुग्ण दीर्घकाळ कोमात जातो. अशा वेळी तातडीने विषारी घटक शरीराबाहेर काढून आयसीयूत उपचार देणे गरजेचे ठरते. ६ महिने रुग्णालयात उपचार; २५ ऑक्टोबरला शुद्ध पुण्यातील वल्लभनगर एसटी बसस्थानकात वैद्य बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर, सुरक्षा रक्षकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. गुंगीच्या औषधामुळे त्यांच्या मेंदूवर गंभीर परिणाम झाला होता, ज्यामुळे ते तब्बल ६ महिने रुग्णालयात उपचार घेत होते. अखेर २५ ऑक्टोबरला ते पूर्ण शुद्धीवर आले आणि त्यांनी अंगठ्यांविषयी विचारणा केल्यावर चोरीचा प्रकार उघडकीस आला. उपचारांमुळे तक्रार देण्यास उशीर झाल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. कामाची गोष्ट प्रवासात अनोळखी व्यक्तीने दिलेला कोणताही पदार्थ खाण्यास दिल्यास तो खाऊ नये, सोन्याचे दागिने घालून प्रवास करणे शक्यतो टाकाळा, प्रवासात अनुचित प्रकार घडल्यानंतर पोलिसांना माहिती द्या.
Source link
एसटी प्रवासात गुंगीचे बिस्कीट देऊन वृद्धाच्या 3 तोळ्यांच्या अंगठ्या चोरल्या:मेंदूवर परिणाम झाल्याने 6 महिने उपचार; शुद्धीवर आल्यावर गुन्हा