- Marathi News
- National
- Here, Bank Systems Are Available For Rent To Commit Fraud, From Aadhaar PAN To UPI PIN, Theft System
दिल्ली15 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

बँकिंग फसवणुकीसाठी गुन्हेगारांना स्वतः सॉफ्टवेअर बनवण्याची गरज नाही. संपूर्ण यंत्रणा भाड्याने मिळते. ऑनलाइन ‘प्ले स्टोअर’वर बँक, वीज-पाणी, गॅस व वाहतूक चलनाच्या नावावर ३६ बनावट ॲप्स आहेत. यातून फसवणूक करणारे सॉफ्टवेअर सायबर गुन्हेगारांना भाड्याने देतात.
सायबर सुरक्षा कंपनी क्लाउडएसईकेने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात ‘एमआर रोबोट’ नावाच्या या नेटवर्कचा खुलासा केला आहे. याचे संचालक टेलिग्रामवर ‘एपीके शील्ड’ नावाच्या बॉटवरून ॲपचा कॅटलॉग उपलब्ध करून देतात. ॲप डाउनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरसारखी बनावट पेजेस बनवतात.बनावट ॲप इन्स्टॉल करून परवानगी दिल्यास हॅकर्स आधार-पॅन, बँक कार्ड क्रमांक, सीव्हीव्ही, एटीएम पिन चोरू शकतात.
भास्कर एक्सप्लेनर: सॉफ्टवेअर भाड्याने घेण्यापासून फसवणुकीपर्यंत, असे चालते हॅकर्सचे काम
- सॉफ्टवेअर रेंटवर:मुख्य संचालक गुन्हेगारांना ठराविक कालावधीसाठी परवाना देतात. सर्वांचे लॉगिन वेगळे असते.
- पुन्हा बनावट ॲप: गुन्हेगार पॅनेलवर बँक किंवा सेवा निवडतात. यंत्रणा त्याच नावाचे आणि लोगोचे बनावट ॲप तयार करते. अनेक बँकांची नक्कल करणे शक्य आहे.
- बनावट लिंक: त्यानंतर ग्राहकाला बनावट लिंक पाठवतात. पेज प्ले स्टोअरसारखेच दिसते, परंतु ॲप खऱ्या स्टोअरमधून येत नाही.
- फोन हॅक:इन्स्टॉल होताच ॲप आत लपलेला दुसरा प्रोग्राम उघडते. हाच मालवेअर असतो, जो फोन हॅक करतो.
- बनावट फॉर्म: यानंतर बँकेसारखे फॉर्म दिसतात. त्यात भरलेली माहिती गुन्हेगारांपर्यंत पोहोचवतात.
- कंट्रोल पॅनलने निगराणी: कोणते फोन ऑनलाइन हे भाडेकरू पॅनेलवर पाहतात. तेथून संदेश मागवणे, एका वेळी सूचना पाठवणे आणि रेकॉर्ड मिटवण्याचे पर्यायही मिळतात.
चलाखी: बनावट ॲप इन्स्टॉल, नंतर ४८ तासांनी सक्रिय
मालवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर किमान ४८ तासांनी आणि ॲप तीन वेळा उघडल्यानंतर सक्रिय होतो. यामुळे सुरक्षा तपासणीत पकडणे कठीण होते. हे फोनचे मॉडेल आणि इतर तपासणी यंत्रणांची ओळखही पटवते.
१० रु. ट्रॅफिक चलनातून बँक तपशील चोरीचे जाळे
नेटवर्कमध्ये ‘आरटीओ चलन’चे बनावट ॲप मिळाले. काही बनावट पेजेस ९ ते १० रु. ‘फी’ दाखवतात. या बहाण्याने नाव, जन्मतारीख, पॅन, मोबाइल क्रमांक मागितला जातो. माहितीचा वापर ओळख चोरण्यासाठी वा फसवणुकीत केला जाऊ शकतो. याच कॅटलॉगमध्ये बनावट कस्टमर सपोर्टची ॲप्सही आहेत.
बँकेचा कॉलही फसवणूक करणाऱ्यांपर्यंत फॉरवर्ड
अहवालात एका गुन्हेगारी टोळीच्या १५३ फोनचे रेकॉर्ड मिळाले. ५८% फोनमध्ये कॉल फॉरवर्डिंग सुरू होते. मालवेअर येणारा कॉल दुसऱ्या क्रमांकावर पाठवू शकतो. बँकेने संशयास्पद व्यवहाराची खात्री करण्यासाठी ग्राहकाला फोन केल्यास, तो कॉल फसवणूक करणाऱ्यापर्यंत पोहोचू शकतो.