Headlines

केंद्राकडून पुरवठा ठप्प; चिमुकल्यांचा अतिसार रोखणारी ‘रोटा’ लस मिळेना:वेळेवर डोस न मिळाल्यास डिहायड्रेशन जिवावर बेतण्याची भीती




लहान मुलांना अतिसार आणि गंभीर जुलाबापासून वाचवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रोटा व्हायरस लसीचा शहरात मागील ३ महिन्यांपासून मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या आरोग्य केंद्रांसह सरकारी रुग्णालयांमधून या लसीचा साठा संपला आहे. परिणामी, लसीअभावी शहरातील हजारो चिमुकल्यांचे लसीकरण रखडले असून बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जिल्हा परिषद आणि मनपाकडून दर महिन्याला ५० ते ६० हजार लसींच्या डोसची मागणी केली जाते. मात्र मागील दोन महिन्यांपासून शासनाकडून लसच उपलब्ध न झाल्याने लसीकरणासाठी येणाऱ्या पालकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. शासनाच्या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत नवजात बालकांना वयाच्या सहाव्या, दहाव्या आणि चौदाव्या आठवड्यात रोटा व्हायरस लसीचे तीन डोस मोफत दिले जातात. यामुळे लहान मुलांमध्ये होणाऱ्या गंभीर अतिसाराला प्रतिबंध होतो. मात्र, लसीचा पुरवठाच नसल्याने आरोग्य केंद्रात येणाऱ्या पालकांना ‘लस उपलब्ध नाही, नंतर या’ असेच उत्तर दिले जात आहे. रोटा व्हायरस लस तुटवड्याची प्रमुख कारणे लस न मिळाल्यास चिमुकल्यांना काय आहेत धोके गंभीर अतिसार व उलट्या : या विषाणूच्या संसर्गामुळे लहान मुलांना दिवसातून अनेक वेळा पाण्यासारखे जुलाब आणि सतत उलट्या होतात. हा त्रास ३ ते ८ दिवस टिकू शकतो.
तीव्र निर्जलीकरण (डिहायड्रेशन): सततच्या उलट्या आणि जुलाबामुळे बाळाच्या शरीरातील पाणी व क्षार वेगाने कमी होतात. वेळेत उपचार न मिळाल्यास हा आजार थेट बाळाच्या जिवावर बेतू शकतो.
ताप आणि पोटदुखी : संसर्गामुळे बाळाला तीव्र ताप येतो, पोटात कळा येतात आणि भूक पूर्णपणे मंदावते. बाळ काहीही खात-पीत नसल्यामुळे अधिकच गळून जाते.
कुपोषणाचा धोका : लहान वयात वारंवार असा आजार उद्भवल्यास बाळाचे वजन झपाट्याने कमी होऊन धोका निर्माण होतो. लसीचा साठा उपलब्ध करा सरकारी दवाखान्यात मोफत मिळणाऱ्या या लसीसाठी खासगी रुग्णालयात एका डोसला सुमारे २ ते ३ हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सामान्य आणि गरीब कुटुंबांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. लहान मुलांच्या आरोग्याशी निगडित हा अत्यंत गंभीर विषय असल्याने राज्य शासनाने तातडीने लसीचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी पालकांमधून जोर धरत आहे. शासन स्तरावर पाठपुरावा सुरू; अतिरिक्त मागणी नोंदवली रोटा लसीचा पुरवठा थेट राज्य शासनाकडून केला जातो. आम्ही दर महिन्याला मागणी करत आहोत. मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणात लस प्राप्त होत असून त्याचे वितरण आम्ही तातडीने केंद्रांना करतो. अतिरिक्त मागणी नोंदवण्यात आली असून शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. – डॉ. उज्ज्वला भामरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका बालरोगतज्ज्ञांकडे २० टक्क्यांनी ओपीडी वाढली, नाजूक बाळांवर थेट आयसीयूत उपचाराची वेळ शहरातील बालरोगतज्ज्ञांकडे सध्या डायरिया आणि अतिसाराची लागण झालेल्या लहान बाळांची ओपीडी वाढली आहे. बालरुग्णांच्या संख्येत सामान्यपेक्षा २० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती बालरोगतज्ज्ञांनी दिली आहे. संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याने अनेक नाजूक बाळांना थेट आयसीयूत (अतिदक्षता विभाग) दाखल करावे लागत आहे. बालकांच्या या अचानक उद्भवलेल्या आजारपणामुळे संपूर्ण कुटुंब चिंतेत सापडले आहे. या वाढत्या संसर्गामागे ‘रोटा व्हायरस’ लसीचा तुटवडा हे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे. सहा महिन्यांच्या आत दिले जाणारे हे लसीकरण योग्य वेळी न झाल्यास बालकांना उलट्या, जुलाब, संसर्ग आणि पोटदुखीचा मोठा धोका निर्माण होतो. सध्या शहरातील बालरोगतज्ज्ञांच्या ओपीडीमध्ये (बाह्यरुग्ण विभाग) अशा बालकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ताप आणि पोटदुखीचा त्रास घेऊन येणाऱ्या रुग्णांचाही यात समावेश आहे. सततच्या उलटी आणि जुलाबामुळे बाळाच्या शरीरातील पाण्याची पातळी (डिहायड्रेशन) झपाट्याने कमी होते. यामुळे रक्तदाबही कमी होण्याची शक्यता असते, जे थेट बाळाच्या जिवावरही बेतू शकते. रोटा व्हायरसचे लसीकरण वेळेवर केल्यास हा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. सध्या अनेक बालकांवर रुग्णालयांच्या आंतररुग्ण विभागात (आयपीडी) उपचार सुरू असल्याची माहिती आहे. बालकांना रोटा व्हायरस लस अत्यंत गरजेची “वर्षभराच्या बाळांना डायरिया होणे सामान्य असले, तरी सहा महिन्यांच्या आतील बाळांच्या अतिसारापासून बचावासाठी ‘रोटा व्हायरस’ लस अत्यंत गरजेची आहे. पालकांनी योग्य वेळेत लसीकरण पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष द्यावे.जेणेकरून बालकांना भरती करण्याची वेळ येणार नाही. -डॉ. प्रशांत जाधव, बालरोगतज्ज्ञ.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *