![]()
औंढा नागनाथ येथे कर्तव्यावर असताना पोलीस उपनिरीक्षकांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. श्री नागनाथ मंदिरात सुरक्षा पोलीस म्हणून तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर विश्वनाथ कदम (५६) रा. रांजाळा) यांचे सोमवार, २५ मे रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ज्ञानेश्वर कदम हे मागील ११ महिन्यांपासून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पोलीस ठाण्यात रुजू झाल्यापासून ते श्री नागनाथ मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना गंभीर आजाराने ग्रासले होते. दरम्यान सोमवारी मंदिराच्या भक्त निवास क्रमांक एक मधील पोलीस विश्रांती कक्षामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. विश्रांती कक्षामध्ये दुर्गंधी येत असल्याने पाहणी केली असता कदम मृतावस्थेत आढळले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस, श्रीधर वाघमारे, दत्ता कानगुले, अमोल इंगोले, जमादार गजानन गिरी, वसीम पठाण, रविकांत हरकळ, शाहेद सय्यद, इकबाल शेख, अमोल चव्हाण यांच्यासह मंदिराचे अध्यक्ष वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ व सुरक्षा गार्ड प्रमुख बबन सोनूणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला व नातेवाईकांना माहिती दिली. नातेवाईक व गावकरी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यानंतर ज्ञानेश्वर कदम यांच्यावर त्यांचे मूळ गाव रांजाळा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या आकस्मात जाण्याने पोलीस दलासह औंढा नागनाथ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कदम यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली व नातवंड असा परिवार आहे.
Source link
औंढा नागनाथ येथील मंदिरात कर्तव्य बजावताना पोलीस कर्मचार्याचा मृत्यू:रांजळा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार