Headlines

नरभक्षक वाघीण जेरबंद, ब्रह्मपुरी वनविभागाला यश:चार बछड्यांना पकडण्यासाठी 'मिशन' सुरू, पीडित कुटुंबांना आर्थिक मदत




ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत गुंजेवाही परिसरात चार महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या नरभक्षक वाघिणीला अखेर वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. या वाघिणीच्या चार बछड्यांचा शोध अजूनही सुरू असून, त्यांना सुरक्षितपणे पकडण्यासाठी वनक्षेत्रात मचाणे उभारून जिवंत भक्ष्य (बेट) लावण्यात आले आहे. बछड्यांना पकडण्याची रीतसर परवानगी मिळाली आहे. बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वन्यजीव तज्ज्ञ डॉ. रविकांत खोब्रागडे आणि नेमबाज अजय मराठे यांची विशेष टीम कार्यरत आहे. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जंगलात तीन थेट प्रक्षेपण करणारे कॅमेरे आणि ३० कॅमेरा ट्रॅप्स बसवण्यात आले आहेत. या घटनेत प्राण गमावलेल्या महिलांच्या कुटुंबांना शासनाकडून प्रत्येकी २५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबाला २५,००० रुपयांची तातडीची मदत यापूर्वीच देण्यात आली होती. आज २५ लाख रुपयांच्या अनुदानापैकी १० लाख रुपयांचा पहिला धनादेश आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पीडित कुटुंबांना वितरित करण्यात आला. यावेळी ब्रह्मपुरीचे उपवनसंरक्षक कुमारस्वामी, सहायक वनसंरक्षक अरविंद आणि श्रीमती अंजली सायनकर उपस्थित होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम यांनी गुंजेवाही गावातील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. मुख्य वाघीण जेरबंद झाली असली तरी बछडे अद्याप मोकळे असल्याने वनविभागाने गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बछड्यांनाही लवकरच जेरबंद केले जाईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *