Headlines

कन्नडच्या नवरा-नवरी डोंगरावर उत्खनन:प्रशासनाच्या विरोधात ‘सत्याग्रह’ आंदोलन, अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित‎




तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रेल नावडी शिवारातील गट क्रमांक ५२ मधील प्रसिद्ध नवरा-नवरीचा डोंगर पोखरून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई आणि स्वतंत्र चौकशीच्या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर १ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जोरदार सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आले. किसान सभेचे कार्यकर्ते उदय गवळी, जनाबाई बागुल, लताबाई बागुल, राहुल गायकवाड आणि बापू निकम आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात उदय गवळी यांनी नमूद केले की, रेल नावडी येथील गट क्र. ५२ मध्ये नवरा-नवरी डोंगरावर प्रचंड उत्खनन झाले असून या कामासाठी पर्यावरण, खाणपट्टा किंवा इतर आवश्यक शासकीय परवानग्या आहेत की नाही याबाबत गंभीर संशय आहे. या बेसुमार उत्खननामुळे लगतच्या प्रादेशिक वन विभागाचे आणि नैसर्गिक संपत्तीचे मोठे नुकसान झाले असून परिसरातील शेतकरी अडचणीत आले आहेत. या आंदोलनाची दखल घेत उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनी सायंकाळी तहसीलदार सारिका भगत यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४८ नुसार अनधिकृत उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. प्रसंगी महसूल सहाय्यक कुणाल दाभाडे व जीवन चव्हाण उपस्थित होते. गौण खनिज उत्खनन करण्यासाठी परवानगी दिलेली नाही ः प्रशासनाचा दावा आमच्या कार्यालयाने गट क्रमांक ५२, रेल नावडी शिवारातील जागेवर गौण खनिज उत्खनन करण्यासाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनी सांगितले. तर वैयक्तिक मालकीच्या गटात उत्खननासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो, ज्यासाठी भूजल सर्वेक्षण, वन विभाग व जिल्हा खणिकर्म अधिकाऱ्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र लागते. आमच्या कार्यालयाने या नवरा-नवरी डोंगर परिसरात उत्खननाची कोणतीही परवानगी दिलेली नसल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी दिनेश झाम्पले यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *