![]()
प्रतिनिधी | कन्नड महाभारतात संजयने युद्धस्थळावरून जसे वार्तांकन केले, तसेच काम आता अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे करतील, असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी १६ रोजी सांगितले. कन्नड शहर पोलिस ठाण्यात नियंत्रण कक्षाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. सहा कोटी जिल्हा नियोजन विकास निधीतून आमदार संजना जाधव यांच्या मागणीची पूर्तता झाली. शहरातील कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ७० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. या कॅमेऱ्यांसाठी कन्नड शहर पोलीस ठाण्यात नियंत्रण कक्ष स्थापन केला. या यंत्रणेचे उद्घाटन पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते झाले. शिरसाट म्हणाले, धृतराष्ट्राला दृष्टी नव्हती. संजय युद्धभूमीवरील प्रसंग सांगत होता. त्याच धर्तीवर संजय शिरसाट सीसीटीव्हीच्या माध्यमातून कन्नड शहरात होणाऱ्या चांगल्या-वाईट गोष्टींवर बारीक नजर ठेवतील. पोलिसांना मदत होईल. कायदा-सुव्यवस्था राखण्यात फायदा होईल. आमदार जाधव यांना आतापर्यंत कन्नड तालुक्यासाठी जवळपास ४२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. कॅमेऱ्यांच्या निगराणीमुळे माता-भगिनी, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थिनी यांच्यात सुरक्षेची भावना निर्माण होईल. लोकांच्या गैरवर्तणुकीला चाप बसेल. नको त्या ठिकाणी गाडी पार्क करणे, कारण नसताना ट्रिपल सीट फिरणे, उशिरापर्यंत चौकात बसणे यावर नजर राहील. राजकारणात कोण कोणाच्या सोबत बैठका करत आहेत याचीही खबरबात मिळेल. सहाय्यक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी तात्काळ निधी द्यावा, असेही त्यांनी आमदार जाधव यांना सांगितले. प्रास्ताविक पोलीस निरीक्षक रघुनाथ सानप यांनी केले. मंचावर सहाय्यक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री, तहसीलदार सारिका भगत, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका नगरसेवक हर्षदा शिरसाट, सिद्धांत शिरसाट, नगराध्यक्ष फरिन बेगम, राजू राजपूत, नगरसेवक अब्दुल जावेद, राजू कमिटी शेख, दीपक पवार आदी उपस्थित होते. आभार पोलिस उपनिरीक्षक चाँद मेंढके यांनी मानले. सुंदर, गुन्हेगारी-भयमुक्त शहराकडे वाटचाल : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. विनय राठोड म्हणाले, अत्याधुनिक कॅमेऱ्यामुळे सुंदर, गुन्हेगारी-भयमुक्त शहराकडे वाटचाल सुरू आहे. सामान्य जनतेने पोलीस खात्याला सहकार्य करावे. चुकीच्या व्यक्तीचे समर्थन करणार नाही : आमदार संजना जाधव आमदार संजना जाधव म्हणाल्या, पालकमंत्री भरघोस निधी देतात. तालुक्यावर त्यांचे विशेष प्रेम आहे. ग्रामीण भागाला भरघोस निधी मिळाला. शहरासाठीही जास्तीत जास्त निधी द्यावा, असे त्यांनी आवाहन केले. पोलिसांना आव्हान देताना त्या म्हणाल्या, चुकीच्या गोष्टींची पाठराखण करणार नाही. कोणी चुकत असेल, तो माझा कार्यकर्ता असला तरी सोडू नका. मीही चुकीच्या व्यक्तीचे समर्थन करणार नाही.
Source link
कन्नड शहरामध्ये ७० सीसीटीव्ही:पोलिस ठाण्यात नियंत्रण कक्ष सुरू