Headlines

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या:छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील मुरुमखेड्याची घटना‎




बँक व खाजगी कर्जाचा वाढता भार, इतर देणी आणि सततच्या नापिकीमुळे त्रस्त झालेल्या तरुण शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना लाडसावंगी जिल्हा परिषद गटातील मुरुमखेडा येथे घडली. विजय गोविंदराव बचाटे (३६) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी सोमवारी सायंकाळी हे टोकाचे पाऊल उचलले. विजय बचाटे यांची मुरुमखेडा शिवारात गट नंबर ४०५ मध्ये ८२ आर शेती होती. या शेतीच्या उत्पन्नावरच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. सोमवारी सायंकाळी त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मृत विजय बचाटे हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. यंदा परिसरात पावसाने उघडीर दिल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. वाढते कर्ज आणि उत्पन्नाची अनिश्चितता यामुळे ते चिंतेत होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *