Headlines

काळानुसार पालकांनीही पालकत्वात बदल स्वीकारावा:डॉ. जयंत पांढरीकर, तारुण्यावस्थेतील मुलांच्या पालकांना ज्येष्ठ किशोरवस्था तज्ज्ञांचे आवाहन‎




आज वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात किशोरावस्थेतील मुले भरकटत जाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या पालकांनी काळानुसार पालकत्वातही बदल स्वीकारावा, असे आवाहन बालरोग व तरुण्यावस्था तज्ज्ञ डॉ. जयंत पांढरीकर, तसेच सर्वच तज्ज्ञांनी पनवेल येथील पालकांच्या भरगच्च कार्यक्रमात केले. महाराष्ट्र राज्य किशोरवस्थातज्ज्ञ संघटना व रायगड बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या वतीने पनवेल, मुंबई येथे वासुदेव बळवंत फडके सभागृहात “बदलत्या काळातील पालकत्व” या विषयावर पालकांकरिता खुल्या चर्चासत्राचे आयोजन केले होते. चर्चासत्रात रायगडचे वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. शेखर दाभाडकर, नागपूरचे डॉ. निशिकांत कोतवाल, नगरचे डॉ. सुचित तांबोळी, अमरावतीचे डॉ. जयंत पांढरीकर, मुंबईच्या डॉ. नीलिमा भांडारकर व चंद्रपूरचे डॉ. राम भारत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचालन वैजापूरचे बालरोग तज्ज्ञ, स्तंभलेखक डॉ. अमोल अन्नदाते यांनी केले. सुरुवातीला कार्यक्रमाचे उद्घाटन संघटनेच्या अध्यक्षा डॉ. चित्रा कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक व स्वागत डॉ. जय भांडारकर, डॉ. खिल्लारे, डॉ. विकास मोरे यांनी केले. कालपेक्षा आजच्या काळात किशोरांसमोर निश्चितच जास्त आव्हाने आहेत. संभ्रमाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पालकांनी हे समजावून घ्यायला हवे, असे मत डॉ. अमोल अन्नदाते यांनी मांडले. अवास्तव अपेक्षांचे ओझे पालकांनी आपल्या किशोरांवर लादू नये, असे मत डॉ. शेखर दाभाडकर यांनी मांडले. एकत्र कुटुंबपद्धती कमी झाल्याने पालकत्वाचा ताण वाढतो आहे. दोघेही पालक नोकरी, व्यवसायात व्यस्त असतात. असे विचार डॉ. निशिकांत कोतवाल यांनी मांडले. शक्य तेवढा हातभार आजी-आजोबांनी लावावा, असे ते म्हणाले. तरुण्यावस्थेत हार्मोन्समुळे शारीरिक, मानसिक, वैचारिक, लैंगिक, भावनिक असे अनेक बदल एकाच वेळी घडत असतात. त्यामुळे किशोरांच्या वागण्यात होणारे बदल पालकांनी समजावून घ्यावेत. मुलांशी सुसंवाद कधीही खंडित होणार नाही, याची काळजी प्रत्येक पालकांनी घ्यावी, असे आवाहन डॉ. जयंत पांढरीकर यांनी केले. करिअर निवडताना पाल्याच्या आवडीचा, क्षमतेचा, बुद्धिमत्तेचा विचार जरूर व्हावा, असे विचार डॉ. सुचित तांबोळी यांनी मांडले. आज दिवसाला जवळपास ५ ते ७ तासांपर्यंत मुलांचा स्क्रीन टाइम वाढला आहे. त्यामुळे चिडचिडपणा, नैराश्य, एकाकीपणा, डिप्रेशनचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्याची मोठी जबाबदारी पालकांनी पार पाडण्याची गरज असल्याचे डॉ. नीलिमा भांडारकर म्हणाल्या. गुणांक, बुद्ध्यांकपेक्षा मुलाच्या ‘भावनांक’, अर्थात ‘इमोशनल कोशन्ट’वर पालकांनी जास्त लक्ष केंद्रित करावे, असे मत डॉ. राम भारत यांनी मांडले. व्यसनाधीनता चिंतेचे सर्वात मोठे कारण आजकाल किशोवयीनामधील व्यसनाधीनता हे एक मोठे चिंतेचे कारण असल्याचे मत सर्वच तज्ज्ञांनी व्यक्त केले. किशोरांच्या लैंगिकता, मानसिक आजार, हिंसाचार, आक्रमक वर्तन, सवंगड्यांचा दबाव, वर्तणूक समस्या , गुंडगिरी, सायबर बुळींग ,स्थूलता इत्यादी अनेक विषयांवर पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना सर्व तज्ज्ञांनी समर्पक उत्तरे दिलीत. काळानुसार पालकांनीही बदल स्वीकारावे आणि किशोरांना सर्व “लाईफ स्किल्स ” अगदी लहानपणापासूनच शिकवाव्या असे आवाहन डॉ.अन्नदाते, डॉ.पांढरीकर यांच्यासह सर्वच तज्ज्ञांनी केले. लोकसंख्येच्या एकूण २२ टक्के असलेल्या किशोरांमध्ये अपघात, मानसिक आजार, आत्महत्या, लठ्ठपणा, वर्तणूक समस्या प्रामुख्याने वाढताना आढळून येत आहेत. तेव्हा पालकांनी गरज भासल्यास वेळीच समुपदेशकांच सल्ला घ्यावा असे, आवाहन सर्व मार्गदर्शकांनी ह्यावेळी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजकांचे व पालकांचे मोलाचे योगदान लाभले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *