![]()
कोयना धरणातील पाणी मुंबईला वळवण्याच्या प्रस्तावावरून राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईला कोयनेचे पाणी देण्यास आमचा कोणताही विरोध नाही. मात्र, मुंबईची तहान भागवण्यापूर्वी सातारा जिल्ह्यातील दुष्काळी आणि टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना पाणी मिळाले पाहिजे, अशी आग्रही भूमिका शिंदे यांनी मांडली. ज्या सातारा जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्राला पाणी आणि वीज दिली, त्याच जिल्ह्यातील नागरिकांना आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मुंबईची वाढती लोकसंख्या, विस्तारत असलेले बांधकाम क्षेत्र आणि भविष्यात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेता कोयना धरणातील पाणी मुंबईकडे वळवण्याच्या प्रलंबित प्रस्तावाला राज्य सरकारकडून गती दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांनी मुंबईच्या पाणीपुरवठ्याच्या गरजेबाबत सकारात्मक भूमिका घेतली. मात्र, मुंबईला पाणी देण्याचा निर्णय घेताना सातारा जिल्ह्यातील पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष होता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले. साताऱ्याने महाराष्ट्राला पाणी दिले, मग साताऱ्यालाच पाण्यासाठी संघर्ष का? कोयना धरणासह जिल्ह्यातील पाच मोठ्या धरणांमुळे सातारा जिल्ह्याने राज्याच्या जलसंपत्तीमध्ये मोठे योगदान दिले आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात वीजनिर्मितीही केली जाते. त्यामुळे राज्याच्या औद्योगिक आणि कृषी विकासाला सातारा जिल्ह्याचा मोठा हातभार लागला आहे. मात्र, जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव आणि सातारा तालुक्यांतील काही भागांना आजही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याच विसंगतीकडे लक्ष वेधत शिंदे यांनी कोयनेतील पाण्याचे नियोजन करताना स्थानिक गरजांना प्राधान्य देण्याची मागणी केली. मुंबईला पाणी देण्यासाठी मोठा आणि खर्चिक प्रकल्प राबवण्याचा विचार होत असेल, तर त्याचवेळी साताऱ्यातील दुष्काळी भागांनाही पाणी देण्यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावा. कोयनेतील उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून स्थानिक जनतेची तहान भागवणे शक्य आहे, असे त्यांनी नमूद केले. 86 टीएमसी पाण्याचा वापर करण्याचा पर्याय मांडला महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांच्यातील पाणीवाटपाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या 86 टीएमसी पाण्याच्या मुद्द्याचाही शिंदे यांनी उल्लेख केला. या पाण्याचे योग्य नियोजन करून ते अडवण्याचा आणि सातारा तसेच मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी वापरण्याचा पर्याय सरकारने तपासावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. केवळ मुंबईच्या पाणीपुरवठ्याचा विचार न करता राज्यातील दुष्काळी भागांनाही पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आवश्यक आहे. कोयना धरणातील पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास साताऱ्यातील टंचाईग्रस्त भागांची गरज पूर्ण करून मुंबईलाही पाणी देता येऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वीजनिर्मितीनंतर समुद्रात जाणारे पाणी मुंबईकडे वळवण्याचा विचार दरम्यान, कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती केल्यानंतर समुद्रात वाहून जाणारे सुमारे 67 टीएमसी पाणी मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी वळवण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे. या प्रस्तावामुळे मुंबईच्या भविष्यातील पाण्याची गरज भागवण्यास मदत होऊ शकते. मात्र, या प्रकल्पाच्या नियोजनात सातारा जिल्ह्यातील पाणीप्रश्नालाही महत्त्व देणे आवश्यक असल्याचे शिंदे यांनी अधोरेखित केले. कोयनेच्या पाण्यावर राज्यातील अनेक भागांचा हक्क आणि अवलंबित्व आहे. त्यामुळे पाण्याचे वाटप करताना स्थानिक शेती, पिण्याचे पाणी आणि दुष्काळी परिस्थिती यांचा विचार व्हायला हवा. साताऱ्यातील टंचाईग्रस्त जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण आवाज उठवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. भाजपची ‘बी टीम’ कोण? चर्चेत आमचा पक्ष नाही : शशिकांत शिंदे दरम्यान, राजकीय घडामोडींवर भाष्य करताना शशिकांत शिंदे यांनी भाजपची ‘बी टीम’ कोण, या चर्चेवरही प्रतिक्रिया दिली. काही घडामोडींच्या संदर्भात अशा प्रकारची वक्तव्ये करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. आम्ही आमच्या पक्षाची भूमिका सातत्याने आणि स्पष्टपणे मांडत असतो. माझा कोणावरही वैयक्तिक आरोप नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीच्या काळात भाजपची ‘बी टीम’ कोण आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असते. मात्र, या चर्चेमध्ये आमच्या पक्षाचे नाव घेण्याचे काही कारण नाही. आमची राजकीय भूमिका स्पष्ट असून, पक्षाची भूमिका आम्ही ठामपणे मांडत राहू, असे शिंदे यांनी सांगितले. हेही वाचा…. रविकांत तुपकरांच्या दुष्काळ संघर्ष यात्रेला शेतकरी-शेतमजुरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:4 डिसेंबरच्या एल्गार महामोर्चासाठी गावोगावी एकजूट शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीनांच्या न्याय्य हक्कांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या दुष्काळ संघर्ष यात्रेला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या 11 दिवसांपासून तुपकर जिल्ह्यातील गावागावांत जाऊन शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधत आहेत. घाटावरील चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा या तालुक्यांमध्ये यात्रेला मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होत आहेत. 4 डिसेंबर रोजी बुलढाणा येथे होणारा एल्गार महामोर्चा ऐतिहासिक करण्यासाठी गावोगावी एकजूट केली जात आहे. त्यामुळे या महामोर्चाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सविस्तर वाचा….
Source link
कोयनेचं पाणी मुंबईला द्या, पण आधी साताऱ्याची तहान भागवा:शशिकांत शिंदेंची मागणी, दुष्काळी भागांसाठी सरकारला सुनावले