Headlines

खुनातील आरोपीला ओळखताच नातेवाईकांनीच घेतली धाव:नंतर दिले पोलिसांच्या ताब्यात; हिदायत पटेल हत्या प्रकरणात मोठी कारवाई




वरिष्ठ काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्या हत्येप्रकरणी महत्त्वाची घडामोड घडली असून, या प्रकरणातील फरार आरोपी राजू बोचे याला अखेर साडेतीन महिन्यांनंतर अटक करण्यात आली आहे. नागपुरातील रवीभवन परिसरात ही कारवाई झाली. विशेष म्हणजे, पोलिसांपूर्वीच हिदायत पटेल यांच्या नातेवाईकांनी आरोपीला ओळखून पकडले आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. राजू बोचे हा रवीभवन येथील सर्किट हाऊस परिसरात जेवणासाठी आला होता. त्याचवेळी अकोट तालुक्यातील काही कार्यकर्ते तेथे उपस्थित होते. त्यांनी बोचे याला ओळखताच त्याला पकडण्यासाठी धाव घेतली. आरोपीने सुरुवातीला पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र फतेह पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला रोखले. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनीही आरोपीला पकडण्यासाठी मदत केली. या दरम्यान काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि नागपूर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी राजू बोचे याला ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी अकोट पोलिसांशी संपर्क साधला. सायंकाळपर्यंत अकोट पोलिसांचे पथक नागपुरात पोहोचले आणि आरोपीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. हिदायत पटेल यांच्यावर 6 जानेवारी रोजी अकोट तालुक्यातील मोहाळा गावातील मशिदीत जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर 7 जानेवारी रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून काही राजकीय नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रुजम्मा, काँग्रेस नेते व माजी नगराध्यक्ष संजय बोडखे आणि राजू बोचे यांच्यावर अकोट शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर हे तिन्ही आरोपी फरार झाले होते. आता राजू बोचे अटकेत असला तरी उर्वरित दोन्ही आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. काँग्रेस पक्षातील प्रभावी नेते हिदायत पटेल हे काँग्रेस पक्षातील प्रभावी नेते म्हणून ओळखले जात होते. ते प्रदेश उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते आणि अकोला जिल्ह्यातील एक महत्त्वाचे राजकीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आठ वर्षे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. तसेच 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून निवडणुकही लढवली होती. सहकार क्षेत्रातही त्यांचा मोठा सहभाग होता. या प्रकरणातील आरोपी अटकेत आल्यानंतर पुढील तपासात आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *