![]()
येथील होळकरकालीन वैभवाचा साक्षीदार असलेल्या सोमवार पेठेतील ऐतिहासिक वेशीवर मोठ्या प्रमाणात राजकीय व सामाजिक जाहिरातींची बॅनरबाजी केली जात आहे. बॅनर लावण्यासाठी वेशीच्या दगडांमध्ये खिळे ठोकले जात असल्याने दगड खराब होत असून, वेशीवरील अठराव्या शतकातील दुर्मिळ फारसी शिलालेखाचेही अस्तित्व धोक्यात आले आहे. ऐतिहासिक वारशाचे नुकसान होण्यापूर्वी पुरातत्त्व विभाग व स्थानिक प्रशासनाने वेशीचे तातडीने संवर्धन करावे, अशी मागणी इतिहासप्रेमी व संशोधकांनी केली आहे. इतिहास संशोधक अनिल किसन दुधाने यांनी या शिलालेखाचे संशोधन केले असून, मोहम्मद तारिक रसूल यांनी त्याचे वाचन केले आहे. शिलालेख संशोधन कार्यात करण सोनी, अतुल पवार आणि डॉ. शैलेंद्र भांडारे यांनी विशेष सहकार्य केले आहे. वेशीच्या डाव्या बाजूला कोरलेला हा उठाव स्वरूपातील फारसी शिलालेख तीन ओळींचा आहे. शिलालेखाच्या देवनागरी वाचनानुसार, छत्रपती रामराजे यांच्या कारकिर्दीत होळकर घराण्याचे प्रतिष्ठित सरदार मल्हारराव होळकर यांच्या अधिपत्याखाली सोमवार पेठ प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाले होते. तसेच हे काम शाहजी दाभाडे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि देखरेखीखाली यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची ऐतिहासिक नोंद त्यावर आढळते. अनेक वर्षांपासून उघड्यावर असल्याने वातावरणातील बदलांमुळे या ऐतिहासिक वास्तूची झीज होत आहे. त्यातच बॅनरबाजीमुळे वेशीचे विद्रुपीकरण होत असून, खिळे ठोकल्याने दगडी बांधकामाचे नुकसान होत आहे. जाहिरातींसाठी ऐतिहासिक वास्तूचा वापर थांबविण्याची गरज असल्याचे इतिहासप्रेमींचे म्हणणे आहे. ऐतिहासिक वारशाचा हा महत्त्वाचा भाग जतन करण्यासाठी प्रशासनाने वेशीची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व संवर्धनाची कामे करावीत. तसेच वेशीवर बॅनर लावण्यास कडक प्रतिबंध करावा, अशी मागणी संशोधकांनी केली आहे. ‘फसली ११६४’ म्हणजे काय? ‘फसली’ ही शेतीच्या हंगामाशी संबंधित जुनी कालगणना पद्धत आहे. शिलालेखावरील फसली ११६४ या उल्लेखाचे रूपांतर सन १७५७ असे करण्यात आले आहे. त्यामुळे वेशीच्या बांधकामाचा काळ निश्चित करण्यासाठी शिलालेखावरील हा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. ऐतिहासिक वेशीवर बॅनर लावल्यास कारवाई ^सोमवार पेठेतील ऐतिहासिक वेशीवर किंवा परिसरात जाहिरात फलक, बॅनर व पोस्टर्स लावण्यास तत्काळ बंदी घालण्यात येईल. वेशीवर खिळे ठोकून बॅनर लावणाऱ्यांवर कडक कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल. वेशीच्या संवर्धनासाठी सुमारे दोन महिन्यांपूर्वी पुरातत्त्व खात्याशी पत्रव्यवहार केला आहे. चांदवडचा ऐतिहासिक वारसा जपणे ही प्रशासनासह नागरिकांचीही जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिक, व्यावसायिक व राजकीय कार्यकर्त्यांनी ऐतिहासिक वास्तूंचे विद्रुपीकरण टाळावे, असे आवाहन करण्यात येईल. – दिनेश सिनारे, मुख्याधिकारी, चांदवड
Source link
चांदवडचा इतिहास बॅनरच्या आड:सोमवार पेठ वेशीवर जाहिराती; खिळ्यांमुळे दगडी बांधकामाची झीज