Headlines

चापानेर परिसरात दुष्काळाचे संकट; रब्बीचा हंगाम धोक्यात:जमिनीत ओलावा नसल्याने पेरणीची आशा मावळली




दरवर्षी निसर्गाच्या कृपेने आणि चांगल्या पावसाच्या जोरावर खरीप आणि रब्बी अशी दोन्ही पिके भरघोस घेणारा चापानेर परिसरातील शेतकरी राजा यंदा मात्र संकटात सापडला आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. खरिपातील मक्का, सोयाबीन आणि कपाशी यांसारख्या प्रमुख पिकांना अपुऱ्या पावसाचा जबर फटका बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे बळीराजा खरीपातील तूट भरून काढण्यासाठी रब्बी हंगामावर अवलंबून होता; मात्र आता तीही आशा मावळल्याचे विदारक चित्र दिसत आहे. सततच्या पावसाच्या तुटवड्यामुळे जमिनीत ओलावा शिल्लक राहिलेला नाही. परिणामी गहू, ज्वारी, बाजरी आणि मोहरी यांसारख्या रब्बी हंगामातील महत्त्वाच्या पिकांची पेरणी पूर्णपणे ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. परिसरातील विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याची पातळी कमालीची घसरल्याने शेतीसाठी सिंचनाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. कांदा लागवडीसाठी आवश्यक असणाऱ्या रोपवाटिकेला नियमित पाण्याची गरज असते; परंतु पाण्याच्या भीषण टंचाईमुळे ही रोपे जगवायची कशी, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून यंदा कांद्याचे उत्पादनही निष्फळ ठरेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. रब्बीतील ज्वारीच्या पिकातून शेतकऱ्यांना खाण्यासाठी धान्य आणि जनावरांसाठी गोड कडबा असा दुहेरी फायदा मिळत असे. मात्र, यंदा पावसाअभावी पेरणीच न झाल्याने धान्य आणि पशुधनासाठी लागणारा चारा हे दोन्ही मिळणे कठीण झाले आहे. चापानेरसह जवळी, आटेगाव टाकळी, हसनखेडा, कविटखेडा, औराळा, विटा आणि मनूर या सर्वच गावांमध्ये रब्बीचे पीक दरवर्षी हमखास घेतले जात असे. परंतु आता पिकेच शेतातून गायब झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. रब्बीच्या उत्पादनावर वर्षभराचे अर्थकारण दरवर्षी रब्बीच्या मिळणाऱ्या उत्पन्नावरच शेतकऱ्यांच्या संपूर्ण वर्षाच्या खर्चाचा ताळमेळ बसत असे. वर्षाचे देणे-घेणे, मुला-मुलींचे लग्न कार्य आणि सुख-दुःखाचे प्रसंग याच पिकांवर नीटनेटके पार पडायचे. परंतु, यंदा खरीप हातातून गेल्यानंतर आता रब्बीही वाया गेल्याने कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा, या चिंतेने चापानेर परिसरातील शेतकरी राजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *