Headlines

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला मोठा दिलासा:गिरीश महाजनांचा मार्ग मोकळा; सहनिबंधकांनी फेटाळला विरोधकाचा अर्ज




जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग सुकर झाल्याचे मानले जात आहे. जामनेर तालुका विकास सोसायटीमधून त्यांच्या विरोधात उभे राहिलेले रघुनाथ सखाराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तांत्रिक कारणास्तव बाद केला होता. या निर्णयाला आव्हान देत आपला अर्ज वैध ठरवण्यासाठी रघुनाथ पाटील यांनी नाशिक येथील विभागीय सहनिबंधकांकडे धाव घेतली होती. मात्र, सहनिबंधकांनीही त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे. सहनिबंधकांच्या या निर्णयानंतर आता रघुनाथ पाटील हे न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. न्यायालयात नेमका काय निर्णय होईल हे अद्याप स्पष्ट नसले तरी, सध्या तरी मंत्री गिरीश महाजन यांच्या बिनविरोध निवडीतील मोठा अडथळा दूर झाला आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या एकूण 21 जागांसाठी येत्या 29 तारखेला मतदान होणार असून, या निवडणुकीपूर्वीच तीन जागांची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम या निवडणुकीत विरोधकांना एकही जागा मिळणार नसून महायुती सर्वच्या सर्व जागा जिंकेल, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. उर्वरित जागांसाठी मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे आणि गुलाबराव पाटील यांच्यासह महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या दोन बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये 90 टक्के जागावाटपावर एकमत झाल्याचा दावा महाजन यांनी केला असला तरी, प्रत्यक्ष जागावाटपाचा तिढा सोडवण्यात नेत्यांना पूर्ण यश आलेले नाही, त्यामुळे ही निवडणूक चर्चेचा विषय बनली आहे. मुक्ताईनगरमध्ये प्रतिष्ठेची लढाई सध्या मुक्ताईनगर, पाचोरा, भडगाव आणि चोपडा या जागांवरून महायुतीत एकमत होऊ शकलेले नाही. मुक्ताईनगरमध्ये मंत्री रक्षा खडसे या उमेदवार असून, त्यांच्या विरोधात त्यांचे पारंपरिक राजकीय विरोधक असणाऱ्या शिवसेना (शिंदे गट) आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते विनोद तराळ आणि देवयानी देशमुख यांनी अर्ज दाखल केला आहे. दोन्ही नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने कुणीही माघार घेण्यास तयार नाही. त्यामुळे येथे महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होण्याची चिन्हे आहेत. पाचोऱ्यात स्थानिक राजकीय वैर अशीच काहीशी कोंडी पाचोरा तालुक्यातही निर्माण झाली आहे. येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात पाचोरा भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचे काका सतीश शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांमधील स्थानिक राजकीय वैर सर्वश्रुत असल्याने, कुणीही माघार घ्यायला तयार नाही. परिणामी, इथला तिढा सोडवणे नेत्यांसाठी कठीण झाले आहे. चोपड्यातही मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता चोपडा तालुक्यातही भाजपचे रोहित निकम उमेदवार असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे घनश्याम अग्रवाल उभे आहेत. येथील जागावाटपाचा वादही अद्याप कायम आहे. मंत्री गिरीश महाजन हे सर्व तिढे लवकरच सोडवले जातील असे सांगत असले तरी, प्रत्यक्ष राजकीय परिस्थिती पाहता यावर तोडगा निघण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे या जागांवर महायुतीमध्येच मैत्रीपूर्ण लढती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *