![]()
जुनी बेज व पिळकोस परिसरात रविवारी मध्यरात्री धाडसी चोरीच्या घटना घडल्या. दोन दुचाकींसह मांगबारी घाटातील नवश्या गणेश मंदिरातील गणपती मूर्तीवरील चांदीचा मुकुट अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुनी बेज येथील नितीन खैरनार यांची स्प्लेंडर (एमएच १५ एफई ४५८८) व पिळकोस येथील पंकज जाधव यांची एचएफ डिलक्स (एमएच ४१ बीसी ४८१६) या दुचाकी मध्यरात्री चोरट्यांनी घरासमोरूनच चोरून नेल्या. मांगबारी घाटातील इच्छापूर्ती गणेश मंदिरातही चोरी करत मूर्तीवरील चांदीचा मुकुट चोरला. या घटना जुनी बेज व पिळकोस गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दोन अज्ञात सराईत भामटे तोंड बांधून गावात फिरताना दिसत आहेत. या प्रकरणी कळवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, काही महिन्यांपासून परिसरात रात्रीची पोलिस गस्त बंद असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. परिसरात रात्रीची पोलिस गस्त तातडीने सुरू करून वाढवावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दादाजी जाधव, शांताराम जाधव, दत्तू वाघ, राहुल सूर्यवंशी, धनंजय जाधव आदींनी केली आहे.
Source link
जुनी बेज व पिळकोसला एकाच रात्री तीन चोऱ्या:दाेन दुचाकींसह मंदिरातील चांदीचा मुकुट लंपास