Headlines

तुकाराम मुंडेंच्या आदेशानंतर धुळ्यात FDA ची धडक:80,208 पेट बॉटल्स जप्त, प्रयोगशाळा अहवालाची प्रतीक्षा




सणासुदीच्या काळात बाजारात विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थ आणि पेयांच्या गुणवत्तेवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) लक्ष केंद्रित केले आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या तपासणी मोहिमेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील नरडाणा औद्योगिक वसाहतीत मोठी कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने एका पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर निर्मिती आस्थापनेची तपासणी करून तब्बल 80 हजार 208 पेट बॉटल्स जप्त केल्या आहेत. या जप्त केलेल्या साठ्याची किंमत सुमारे 8 लाख 16 हजार 32 रुपये असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. नरडाणा एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक टी-11 येथे असलेल्या शिवाय बिव्हरेजेस एलएलपी या आस्थापनेची अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तपासणी केली. तपासणीदरम्यान विविध ब्रँडच्या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला. या साठ्यातील उत्पादनांच्या दर्जाबाबत तसेच त्यावरील छापेबाबत अधिकाऱ्यांना संशय निर्माण झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली. तीन ब्रँडचे नमुने तपासणीसाठी तपासणीदरम्यान ‘बरेली’, ‘ग्रीष्मा एक्वा’ आणि ‘एक्वा अजंता’ या तीन प्रकारच्या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचे अन्न नमुने घेण्यात आले. हे नमुने अधिकृत प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. संबंधित पाण्याच्या बाटल्यांवरील माहिती आणि उत्पादनाच्या दर्जाबाबत संशय असल्याने उर्वरित साठा ताब्यात घेण्यात आला. अन्न पदार्थ मिथ्या छापाचा तसेच कमी दर्जाचा असण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण संबंधित साठा जप्त केला आहे. प्रयोगशाळेच्या अहवालातून या पाण्याची गुणवत्ता, लेबलवरील माहिती आणि इतर बाबी स्पष्ट होणार आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित आस्थापनेविरुद्ध अन्न सुरक्षा कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सणासुदीच्या काळात FDA ॲक्शन मोडमध्ये दसरा, नवरात्र आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खाद्यपदार्थ, मिठाई तसेच पॅकेज्ड पेयांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या काळात ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित धोका टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विविध ठिकाणी तपासणी आणि नमुना संकलनाची मोहीम राबवली जात आहे. त्याच मोहिमेचा भाग म्हणून धुळे जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली. येरमाळ्यातही 325 किलो खवा जप्त दरम्यान, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथेही मोठी कारवाई केली होती. कळंब तालुक्यातील येरमाळा परिसरात खव्याची मोठी बाजारपेठ असल्याने या ठिकाणी प्रशासनाचे विशेष लक्ष होते. तपासणीदरम्यान भेसळीचा संशय असलेला तब्बल 325 किलो खवा जप्त करण्यात आला होता. या खव्याची अंदाजे किंमत 74 हजार 750 रुपये होती. या प्रकरणात दोन खवा विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. एकीकडे येरमाळ्यात खव्याचा साठा जप्त करण्यात आला, तर आता धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचा साठा ताब्यात घेण्यात आला आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यावसायिकांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याचे दिसून येत आहे. नरडाणा येथील पाण्याच्या बाटल्यांच्या नमुन्यांचा प्रयोगशाळा अहवाल आल्यानंतर या प्रकरणातील पुढील कारवाईचे स्वरूप स्पष्ट होणार आहे. हेही वाचा… विवाहितेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग:पतीला फोटो पाठवल्याचा आरोप, तरुणाला अटक मैत्रीचा फायदा घेत विवाहितेशी प्रेमसंबंध निर्माण करून तिचे 70 हून अधिक व्हिडिओ काढल्याचा आणि नंतर ते सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याचा प्रकार डोंबिवलीतील शिरढोण परिसरात समोर आला आहे. महिलेने संबंध पुढे ठेवण्यास नकार दिल्यानंतर संबंधित तरुणाकडून तिला त्रास देण्यात आल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर आरोपीने महिलेच्या पतीला तिचे काही फोटो पाठवल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी कुणाल शिंगाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *