![]()
उसाला प्रतिटन ५ हजार रुपये दर देण्यात यावा, अशी मागणी ऊस दर संघर्ष समितीने केलेली असली तरी साखर कारखानदार मात्र दर जाहीर करण्यास तयार नाहीत असे दिसते. त्यामुळे तिसऱ्या दिवशीही पंढरपूर तालुक्यातील चारही साखर कारखाने बंद होते. ग्रामीण भागातील ऊस तोडणी कार्यक्रम ठप्प झालेला असून, हजारो वाहने साखर कारखान्यावर ऊस घेऊन उभी आहेत. दरम्यान, ऊस दर संघर्ष समितीच्या या आंदोलनास पंढरपूर अधिवक्ता संघाने पाठिंबा दिला असून, या आंदोलनामुळे कायदेशीर बाबी निर्माण झाल्यास वकील संघाचे सदस्य मोफत खटले लढतील, असे अधिवक्ता संघाने जाहीर केले आहे. यंदा सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊसाची पहिली उचल जाहीर न करताच गाळप हंगाम सुरु केला आहे. बाजारात साखरेचा भाव ५० रुपये किलो, बगॅस ८ हजार रुपये टन विकले जात असताना उसाला ५ हजार रुपये प्रति टन भाव मिळावा, अशी मागणी ऊस दर संघर्ष समितीने केली आहे. या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून पंढरपूर तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट २, विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणूनगर गुरसाळे, सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना भाळवणी, सीताराम शुगर्स खर्डी हे कारखाने बंद आहेत. विठ्ठल आणि विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या गव्हाणीत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे गाळप ठप्प होऊन कारखाना परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऊस उत्पादकांचे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. शेतकरी संघटनांनी गव्हाण बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पंढरपूर बार असोसिएशनने पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या या लढ्यात शेतकऱ्यांना आवश्यक ते सर्व कायदेशीर सहकार्य विनामूल्य करण्याची घोषणा पंढरपूर बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. यावेळी पंढरपूर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. धनाजी चव्हाण, उपाध्यक्ष ॲड. उदय बागल, सहसचिव ॲड. तुषार रोकडे, माजी उपाध्यक्ष ॲड. महेश कसबे, ॲड. संकेत पवार, ॲड. सागर पाटील आणि ॲड. आशुतोष जाधव, ॲड किरणराज घोडके आदी उपस्थित होते. साखर कारखानदारांकडून आडमुठी भूमिका घेतलेली असतानाच शेतकरी संघटनेच्या आंदोलक कार्यकर्त्यांसोबत ऊस वाहतूक करणारे वाहन मालक, काही संचालक, साखर कारखानदारांचे कार्यकर्ते वारंवार हुज्जत घालत असल्याचे दिसून येते. ऊस दर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी सरसकट साखर कारखाने बंद पाडलेले असताना आंदोलनास राजकीय रंग देण्याचा प्रयत्न काही कारखानदार आणि त्यांचे कार्यकर्ते करत आहेत. वाहन मालकांना कारखान्याकडून घेतलेली उचल फिटेल की नाही याची भीती आहे. तर काही संचालकांना चेअरमनची बाजू घेतल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करायचा असल्याने हा वाद आणि राजकीय रंग येत आहे.
Source link
दर जाहीर न केल्याने तोडगा नाही, पंढरपुरातील चारही कारखाने बंद:आंदोलक शेतकऱ्यांच्या गव्हाणीमध्ये उड्या