Headlines

दुष्काळाचा सामना एकजुटीने करा; बांधावरून वाद नको:तक्रारीही नको, मनोज जरांगे यांचे शेतकऱ्यांना आवाहन, अखंड हरिनाम सप्ताहाला उपस्थिती




सध्या दुष्काळाचे भयानक संकट आपल्या समोर उभे आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने पुढे येऊन एकमेकांना सहकार्य करावे. शेतकऱ्यांनी एकमेकांच्या बांधावरून वाद घालू नयेत, एकमेकांचे बांध कोरू नयेत आणि गावातील एकाही व्यक्तीची तक्रार पोलीस ठाण्यापर्यंत जाणार नाही, याची काळजी घ्यावी. शेतीला जोडधंदा म्हणून नोकरी व व्यवसाय या क्षेत्रात उतरा याशिवाय प्रगती शक्य नाही असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी केले. साकत येथे श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हभप उत्तम महाराज वराट यांच्या नेतृत्वात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ मनोज जरांगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जरांगे पाटील यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना एकजुटीचे महत्त्व पटवून दिले. दुष्काळाचे संकट गंभीर असून अशा परिस्थितीत समाजातील प्रत्येकाने एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. पाणी आणि शेतीच्या प्रश्नांवरून आपापसांत वाद निर्माण करण्याऐवजी सामंजस्याने मार्ग काढावा. शेतकऱ्यांनी एकमेकांच्या बांधावरून वाद करू नयेत. गावातील वाद गावातच सामोपचाराने मिटवावेत. कोणत्याही कारणामुळे पोलीस ठाण्यापर्यंत तक्रार जाणार नाही, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. या सप्ताहाच्या शुभारंभप्रसंगी संत-महंत, वारकरी संप्रदायातील मान्यवर, ग्रामस्थ आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुष्काळाच्या संकटात एकमेकांना मदतीचा हात द्या, आपापसांतील वाद टाळा आणि समाजातील गोरगरिबांच्या पाठीशी उभे राहा, हा संदेश साकतनगरीतील या धार्मिक सोहळ्यातून देण्यात आला. साकत येथील अखंड हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ करून मनोज जरांगे पाटील जामखेड शहरात आल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड झालेले सचिन घुमरे यांचा मनोज जरांगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यानंतर समाजबांधवांच्यावतीने बीड कॉर्नर येथे प्रा. मधुकर राळेभात व संजय काशिद तसेच अनेक समाज बांधवांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला. यानंतर मंगेश आजबे मित्रमंडळाच्यावतीने त्यांच्या कार्यालयासमोर सत्कार करण्यात आला. तरुणांनो व्यसनांच्या आहारी जाऊ नका तरुणांना मार्गदर्शन करताना जरांगे पाटील म्हणाले, तरुणांनी व्यसनांच्या आहारी जाऊ नये. समाजात एकजूट कायम ठेवून सामाजिक कार्यात सहभाग घ्यावा. गावातील गोरगरीब, गरजू आणि अडचणीत असलेल्या लोकांना मदत करावी. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका तरुणांनी स्वीकारावी. समाजाची ताकद ही एकजुटीत असून परस्पर सहकार्य आणि सामाजिक बांधिलकीतूनच गावाचा विकास साधता येतो, असा संदेश त्यांनी दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *