![]()
पाथर्डी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी कुटुंबांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी तालुक्यातील कळसपिंपरी येथे शेतकरी भीमसेन शंकर भवार यांच्या घरी दिवाळी साजरी केली. शेतातील पिकांची चिंता, पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि आर्थिक अडचणी अशा संकटांचा सामना करणाऱ्या भवार कुटुंबीयांसोबत त्यांनी जमिनीवर बसून पिठलं-भाकरीच्या जेवणाचा आस्वाद घेतला. मंत्री विखे व आमदार मोनिका राजळे यांनी कळसपिंपरी ग्रामस्थांशी संवाद साधून गावातील विविध समस्या जाणून घेतल्या. लहान मुलांना मिठाई व फटाक्यांचे वाटप केले. ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, भाजप मंडल अध्यक्ष दिगंबर भवार, बाजार समितीचे संचालक अजय रक्ताटे, नारायण पालवे, नगरसेवक निखिल वारे, संभाजी वाघ, मुकुंद आंधळे, युवराज फुंदे, प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, गटविकास अधिकारी राजेंद्र धस उपस्थित होते. भवार कुटुंबीयांच्या घरी पोहोचल्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी पणती पेटवून दिवाळीचा आनंद साजरा केला. पारंपरिक पद्धतीने त्यांचे औक्षण करण्यात आले. त्यांनी सोबत आणलेले कपडे व मिठाई कुटुंबीयांना भेट दिली. मुलांच्या शिक्षणासह शेती व्यवसायाची माहितीही त्यांनी जाणून घेतली. शासकीय सोपस्कार बाजूला ठेवत जमिनीवर बसून त्यांनी कुटुंबीयांसोबत साधेपणाने भोजन केले. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपयांची अग्रिम मदत जमा केली आहे. यापूर्वी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून अनेक वर्षांपासून थकीत असलेली वीजबिलेही माफ करण्यात आली आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून,मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्व सदस्य या संकटात शेतकऱ्यांच्या सोबत आहेत, असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दुष्काळग्रस्त कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. पशुधन जगविण्यासाठी चारा उत्पादनाला प्रोत्साहन दुष्काळाच्या काळात जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर मात करण्यासाठी चारा उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने चारा उत्पादनाचे नियोजन केले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे, त्यांना चारा उत्पादनासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. पशुसंवर्धन आणि कृषी विभागाच्या संयुक्त पाहणीतून पशुधनाची संख्या तसेच उपलब्ध चाऱ्याचा आढावा घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे पशुधन सुरक्षित राहावे आणि चारा टंचाईचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टीने प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
Source link
दुष्काळाच्या झळा:दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबासोबत पालकमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी, ग्रामस्थांच्या समस्या ऐकून अधिकाऱ्यांना दिल्या सूचना