Headlines

राहुरीकरांची दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी:शनिवार राहुरीकरांसाठी ठरला खरेदीचा वार, दुकानांत गर्दीच गर्दी




दुष्काळी परिस्थिती असूनही आनंदाचा दिवाळी सण अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला असताना राहुरीची बाजारपेठ सध्या दिवाळीच्या विविध वस्तूंच्या सजावटीत सजली आहे. राहुरी शहरात दिवाळी साहित्यासाठी उभारलेल्या रंगीबेरंगी स्टॉल्सवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र तरीही दुष्काळाचे सावट असल्याने दरवर्षीप्रमाणे खरेदी यंदा कमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. रंगीबेरंगी आकाशकंदील, लाईट माळा, पारंपरिक मातीच्या पणत्या, आकर्षक चायनीज पणत्या, तोरणे, रांगोळी असे विविध साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे. साधे आकाशकंदील १० रुपयांपासून ७००-८०० रुपयांपर्यंतच्या दरात विक्री होत आहे. कापड दुकानातही कपडे खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी नवीन कपडे खरेदी करण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच लगबग सुरू आहे. दिवाळी आली की सर्वांच्या आनंदाला आणि उत्साहाला उधाण येते. नवीन कपडे आणि फराळाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे कपड्यांची दुकानेही झगमगली आहेत. रेडिमेड कपडे, साड्या आणि मुलांसाठी आकर्षक पोशाख खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. तसेच लाडू, चिवडा, करंजी यांसारख्या फराळासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदीही जोमात सुरू आहे. किराणा दुकानदारांकडे तेल, रवा, साखर, खोबरे, सुके मेवे यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. फटाक्यांच्या दुकानांवर गर्दी दिसून येत आहे. पणत्या, रांगोळी लक्ष्मीपूजनाचे साहित्य, दारावरच्या सजावटींची तोरणे, फुलांची तोरणे आदी वस्तूंची बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे. या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची शनिवारी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, बाजारपेठेत गर्दी तर होती. परंतु, वाहतुकीची व्यवस्था तितकीशी दिसून आली नाही. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. नागरिकांच्या दुचाकींमुळे या कोंडीत अधिकच भर पडली. या सर्वांचा त्रास पायी जाणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागला. परंतु, सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होणार हे निश्चित होते. त्यामुळे वाहतूक आणि वाहनांच्या पार्किंगसाठी जर अधिक चांगले नियोजन झाले असते कोंडीची डोकेदुखी काही अंशी कमी झाली असती असे नागरिकांचे म्हणणे होते. लक्ष्मीपूजनाच्या साहित्य खरेदीसाठी गर्दीच गर्दी दरम्यान, गुरुवारी वसुबारसेने दिवाळी सणाला प्रारंभ झाला. सुमारे सात दिवस दिवाळी मोठ्या आनंदाने नागरिक साजरी करणार आहे. शहरातील प्रत्येक गल्ली आणि दुकानातून सध्या फुलांच्या सुगंधासोबत दिवाळीचा आनंद दरवळत आहे. या सणासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे. आज दिवाळीतील मुख्य लक्ष्मीपूजन आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी झाली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *