भारतीय सैन्यात गेल्या सात वर्षांपासून देशसेवेचे कर्तव्य बजावणारे महालगावचे सुपुत्र मेजर अक्षय रामेश्वर शेळके (वय 26) यांचे मेंदूच्या आजाराने शुक्रवारी (दि. 28) रात्री पुणे येथील सैन्याच्या न्यू कमांड हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. अवघ्या 26 व
.
अक्षय शेळके हे सात वर्षांपूर्वी भारतीय सैन्यात भरती झाले होते. बेळगाव येथील मराठा बटालियनमध्ये त्यांनी सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर हिमाचल प्रदेश तसेच जम्मू-काश्मीरमधील कृष्णाघाटी, पुंछ सेक्टर यांसारख्या संवेदनशील भागांत त्यांनी देशसेवेचे कर्तव्य बजावले. सध्या ते जम्मू-काश्मीर येथे कार्यरत होते. दरम्यान, त्यांना मेंदूचा आजार झाल्याने गेल्या तीन महिन्यांपासून पुणे येथील सैन्याच्या न्यू कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
शेळके कुटुंबातून देशसेवेत जाणारे अक्षय हे तिसरे सदस्य होते. आई-वडिलांचे ते एकुलते एक पुत्र असून त्यांना एक बहीण आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, बहीण, आजी-आजोबा, काका, चुलती, चुलत भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
अक्षय शेळके यांच्या पार्थिवावर महालगाव येथे शासकीय इतमामात रात्री 9:30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. बसस्थानकापासून त्यांच्या राहत्या घराशेजारील शेतापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांसह जवानांनी उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप दिला. लष्कराच्या वतीने त्यांना अखेरची फायर सलामी देण्यात आली. हा क्षण उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा ठरला.
महाराष्ट्र, गोवा, गुजरात सब एरिया कमांडचे जीओसी, मिलिटरी स्टेशन छत्रपती संभाजीनगर, मिलिटरी स्टेशन सेल, कमांडिंग ऑफिसर 36 मराठा मीडियम रेजिमेंट, कमांडिंग ऑफिसर 9 मराठा लाईट इन्फंट्री, सुभेदार मेजर 9 मराठा लाईट इन्फट्री, मेजर सातुरे (13 महार रेजिमेंट) यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

तसेच, उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जर्हाड, तहसीलदार सुनील सावंत, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप भिवसने, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे आणि सरपंच रोहिणी नानासाहेब काळे यांच्या वतीनेही पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
अक्षय यांच्या निधनाची बातमी समजताच महालगावातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली. आजी-माजी सैनिक, ग्रामपंचायत, विविध सामाजिक संस्था, राजकीय पदाधिकारी, युवक मंडळे आणि हजारो ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला. आपल्या गावचा तरुण सुपुत्र देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना हरपल्याने संपूर्ण गाव शोकमग्न झाले होते.