Headlines

निवडणुकीत 50 लाखांचा 'गिफ्ट बॉक्स' कोणी दिला?:शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाचा नोटांच्या बंडलांसह व्हिडिओ पोस्ट करत संदीप देशपांडेंचा खळबळजनक आरोप




मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुका होऊन जवळपास 10 महिने उलटल्यानंतर आता त्या निवडणुकीतील ‘धनशक्ती’च्या वापराचा एक अत्यंत खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते संदीप देशपांडे यांनी मंगळवारी (24 नोव्हेंबर 2026) आपल्या ‘एक्स’ (X) खात्यावरून शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे कुलाबा प्रभाग क्रमांक 226 चे शाखाप्रमुख संतोष पवार यांचा एक व्हिडिओ पोस्ट करत राजकारणात मोठा बॉम्ब टाकला आहे. या व्हिडिओमध्ये संतोष पवार एका बंद बॉक्सचे सील उघडताना दिसत असून, त्यात तब्बल 50 लाख रुपयांच्या नोटांची बंडले असल्याचे सांगत आहेत. या व्हिडिओनंतर पत्रकार परिषद घेत संदीप देशपांडे यांनी सरकार आणि निवडणूक आयोगाकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे? संदीप देशपांडे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कुलाबा येथील प्रभाग क्रमांक 226 चे शाखाप्रमुख संतोष पवार स्वतःची ओळख सांगून एक बंद बॉक्स उघडताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये संतोष पवार म्हणतात की, “15 जानेवारी रोजी झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही महायुतीचे काम करत होतो. त्यावेळी एका वरिष्ठ नेत्याने मला ‘तू तुझ्या हिशोबाने काम कर’ असे सांगत हा गिफ्ट बॉक्स पाठवला होता. तो बॉक्स मी आजतागायत उघडला नव्हता, आता तुमच्यासमोर उघडून दाखवतो.” बॉक्समध्ये 50 लाखांची रोकड बॉक्स उघडल्यानंतर आत नोटांची बंडले भरलेली दिसतात. “या बॉक्समध्ये कमीत कमी नाही म्हटले तरी 50 लाख रुपये आहेत,” असा दावा संतोष पवार या व्हिडिओमध्ये करताना ऐकू येतात. वॉर्ड क्रमांक 226 मधील ‘त्या’ निवडणुकीचे नाट्य आणि नार्वेकर कनेक्शन! पत्रकार परिषदेत बोलताना संदीप देशपांडे यांनी कुलाब्यातील प्रभाग क्रमांक 226 मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रभाग क्रमांक 226 मध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर आणि अपक्ष उमेदवार तेजल पवार यांच्यात थेट लढत झाली होती. त्यावेळी मनसेचे उमेदवार बबन महाडीक यांचा अर्ज तांत्रिक कारणांनी बाद झाला होता, तर मनसे-उबाठा युतीमुळे उबाठा गटाने तिथे उमेदवार दिला नव्हता. अर्ज बाद होणे आणि बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न त्या निवडणुकीत अनेक अपक्ष उमेदवारांचे अर्ज एक-एक करून बाद झाले होते किंवा काहींनी माघार घेतली होती. अर्ज छानणीच्या वेळी खुद्द विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तिथे गेल्याचा व्हिडिओही त्या काळात प्रचंड गाजला होता. त्यामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आधीच हे पैसे दिले होते की निवडणुकीनंतर कोणाचे काम करू नये म्हणून दिले होते, याचा खुलासा संतोष पवार यांनीच करावा, असे देशपांडे म्हणाले. हा व्हिडिओ 10 महिन्यांनंतर बाहेर का आला? – संदीप देशपांडे संजय राऊत यांनी 2 दिवसांपूर्वी खासदारांना 150 कोटी रुपये दिल्याचा आरोप केल्यानंतर आता थेट नोटांनी भरलेल्या बॉक्सचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. यावर संदीप देशपांडे यांनी अनेक कळीचे प्रश्न उपस्थित केले. हा व्हिडिओ कोणत्याही परिस्थितीत ‘एआय जनरेटेड’ वाटत नाही आणि संतोष पवार आजही तिथेच शाखाप्रमुख आहेत. निवडणुकीच्या काळात इतकी मोठी रोकड कोणी आणि कोठून आणली, याची सरकारने आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे चौकशी केली पाहिजे. इतक्या उशिरा व्हिडिओ बाहेर येण्यामागे दबाव होता का? जानेवारी महिन्यात निवडणूक झाली असताना नोव्हेंबरमध्ये हा व्हिडिओ बाहेर आला आहे. हा व्हिडिओ ज्यांनी कोणी बनवला किंवा पाठवला, त्यांच्यावर त्यावेळी कोणाचा दबाव होता का, की आता अंतर्गत वादातून हा व्हिडिओ बाहेर आला आहे, हे संतोष पवारच सांगू शकतील. निवडणुकांमध्ये पैशांचा खेळ कसा होतो, याचे हे जिवंत उदाहरण असून लोकशाहीसाठी हे अत्यंत घातक असल्याचे संदीप देशपांडे यांनी ठणकावून सांगितले. ————————————————– हेही वाचा… विलीनीकरण नको, तरीही महायुतीत या!: भाजपचा शरद पवारांसमोर नवा पर्याय? दिवाळीत गुप्त बैठकांचा दावा; राष्ट्रवादीच्या सत्तासमीकरणात मोठा ट्विस्ट महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळू लागले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू असल्या, तरी आता भाजपने थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर (शरदचंद्र पवार गट) एक नवा आणि अनपेक्षित पर्याय ठेवल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण झाले नाही, तरीही शरद पवार यांच्या पक्षाला स्वतंत्र चौथा घटक म्हणून एनडीए (NDA) आणि महाराष्ट्रातील महायुतीमध्ये सहभागी करून घेण्यास भाजप अनुकूल असल्याची चर्चा सुरू आहे. दिवाळीच्या काळात शरद पवार गटाच्या नेतृत्वाने राज्यातील भाजप नेत्यांसोबत गुप्त बैठका घेतल्याचा दावाही करण्यात येत असून, यामुळे राज्याच्या सत्तासमीकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *