![]()
गणेशोत्सवानंतर नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील ७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी युनिटच्या कॅडेट्सनी पुढाकार घेत स्थानिक शीव नदी परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबवले. विसर्जनानंतर नदीपात्र आणि घाट परिसराची स्वच्छता करून छात्रसैनिकांनी पर्यावरण संवर्धनाचा उत्तम संदेश दिला. अनंत चतुर्दशीच्या विसर्जनानंतर शीव नदीकाठी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य, प्लास्टिक पिशव्या, फुलांचे हार व इतर कचरा साचला होता. यामुळे नदीचे पाणी दूषित होऊन परिसराचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या वतीने ‘पुनीत सागर अभियान’ व ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत शीव नदी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या अभियानात एन सी सी अधिकारी लेफ्टनंट बापू शेळके यांच्या नेतृत्वात एकूण ५५ एन सी सी कॅडेट्स नी सहभाग घेतला. या मोहिमेदरम्यान एनसीसी कॅडेट्सनी नदीपात्र व परिसरातील प्लास्टिक कचरा, थर्माकोल, सुके व ओले निर्माल्य काळजीपूर्वक गोळा केले. जमा करण्यात आलेले निर्माल्य खतनिर्मितीसाठी योग्य ठिकाणी सुपूर्द करण्यात आले, तर सुक्या व प्लास्टिक कचऱ्याची ग्रामपंचायतीच्या घंटागाडीत विल्हेवाट लावण्यात आली. कॅडेट्सनी या मोहिमेदरम्यान स्थानिक नागरिक व भाविकांना जलप्रदूषण टाळण्याचे आणि प्लास्टिकमुक्त परिसरासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. एनसीसीच्या या तत्पर व शिस्तबद्ध कार्याबद्दल संस्थेचे जनरल सक्रेटरी गोविंदराव होळकर व सर्व पदाधिकारी, बटालियनचे कमान अधिकारी लेफ्टनंट कर्नल कनिष्क गौर, प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल संदीप वाबळे, प्राध्यापक वर्ग, ग्रामस्थ आणि स्थानिक प्रशासनाकडून छात्रसैनिकांचे कौतुक होत आहे. सण-उत्सव साजरे करताना पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. जलस्रोत स्वच्छ राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. – डॉ. आदिनाथ मोरे, प्राचार्य
Source link
पर्यावरण संवर्धनाचा संदेश:शीव नदी घाटाची एनसीसी छात्रांकडून स्वच्छता, जमा केलेले निर्माल्य खतनिर्मितीसाठी योग्य ठिकाणी सुपूर्द