![]()
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान किरकोळ धक्क्याच्या कारणावरून दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना वैजापूर शहरात समोर आली आहे. या मारहाणीत एका युवकाच्या डोक्याच्या उजव्या बाजूला लोखंडी कडीने वार करून गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. तसेच वाद सोडवण्यासाठी आलेल्या अन्य युवकांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास एका हॉटेलसमोर शान-ए-मराठा गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरू होती. यावेळी हिंदू हृदयसम्राट गणेश मंडळातील नितीन होंड यांना चेतन जाधव यांचा धक्का लागला. यावरून नितीन होंड यांनी चेतन जाधव यांच्याशी शिवीगाळ करत थप्पड व बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर नितीन होंड यांनी हातातील लोखंडी कडीने चेतन जाधव यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूला वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यात चेतन जखमी झाले. दरम्यान, वाद सोडवण्यासाठी आलेल्या कार्तिक बोर्डे, शाम साळुंके, प्रितेश साळुंके, मयूर चव्हाण व शान पवार यांनाही आरोपींनी मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नितीन होंड, साई पवार, गौरव होंड, संकेत आहेर, विशाल आहेर, साईराज देवकर, कृष्णा जाधव व विशाल कडे यांच्याविरुद्ध वैजापूर ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सर्व आरोपी येवला रोड परिसरातील जीवनश्री कॉलनी, वैजापूर येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Source link
वैजापूरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान हाणामारी:दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांत वाद; 8 जणांवर पोलिसांत गुन्हा