Headlines

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पाणी, शिक्षण, आरोग्यावर भर:मनपाला 5 वर्षांच्या विकास आराखड्याचे निर्देश




अमरावती शहराच्या विकासासाठी पाणी, शिक्षण आणि आरोग्य या त्रिसूत्रीवर भर देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. अमरावतीकरांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. महापालिकेच्या आढावा बैठकीत त्यांनी पुढील पाच वर्षांचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. शनिवारी दुपारी झालेल्या या बैठकीत अमरावती शहराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या आढावा सभेला अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके, बडनेराचे आमदार रवि राणा, विधान परिषद सदस्य संजय खोडके व धीरज लिंगाडे यांच्यासह माजी पालकमंत्री प्रवीण पोटे आणि पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी शहरातील बेघर नागरिकांना प्राधान्य देत घरांचे पट्टे (हक्कपत्रे) वाटप करण्याचे निर्देश दिले. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, अशा नागरिकांची यादी तयार करून त्यांना विविध गृहनिर्माण योजनांद्वारे घरे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी, असेही ते म्हणाले. पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी जलविस्तार योजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले, जेणेकरून शहरातील सर्व भागांमध्ये नियमित व शुद्ध पाणीपुरवठा होईल. रस्ते, नाले, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत गरजांवर प्राधान्याने काम करण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दिले. ऊर्जाबचत आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने शहरातील पथदिवे सौरऊर्जेवर चालविण्याची सूचना करण्यात आली. तसेच, मनपाच्या शाळा, दवाखाने आणि प्रशासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शहरातील अतिक्रमणे हटवून सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्याचबरोबर, लघु व्यावसायिकांसाठी स्वतंत्र हॉकर्स झोन तयार करून त्यांना नियोजित जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस महापौर श्रीचंद तेजवाणी, उपमहापौर सचिन भेंडे, स्‍थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, गटनेता डॉ. राजेंद्र तायडे, गटनेता नाना आमले, शहर सुधार समिती सभापती राधा कुरील, उपसभापती सुमती ढोके, शिक्षण समिती सभापती अॅड. प्रीती रेवणे, महिला बाल कल्‍याण समिती सभापती ममता आवारे, उपसभापती लता देशमुख, विधी समिती उपसभापती डॉ. मधुरा काहाळे, आयुक्‍त वर्षा लड्डा, अतिरिक्‍त आयुक्‍त शिल्‍पा नाईक, उपायुक्‍त नरेंद्र वानखडे, उपायुक्‍त योगेश पिठे, नगरसेवक आणि विविध विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *