Headlines

पुणे ग्रामीण पोलिसांनी 2 कोटी 95 लाखांचा मुद्देमाल परत केला: फिर्यादींना 218 तोळे सोने, सहा किलो चांदी आणि 44 हजारांची रोकड सुपूर्द



दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांत जप्त केलेला सुमारे 2 कोटी 95 लाख रुपयांचा मुद्देमाल पुणे ग्रामीण पोलिसांनी फिर्यादींना परत केला. यात सुमारे 218 तोळे सोने, सहा किलो चांदी आणि अंदाजे 44 हजार रुपये रोकड आहे.

.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात हा मुद्देमाल संबंधितांना देण्यात आला.

बारामती तालुका, माळेगाव, दौंड, यवत, शिक्रापूर, जेजुरी, सासवड, राजगड, वेल्हा, खेड, मंचर, पारगाव, नारायणगाव आणि ओतूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हे गुन्हे घडले होते.

पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली.

न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुद्देमाल परत करण्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम झाला. पुणे ग्रामीण पोलिसांच्या वार्षिक निरीक्षणादरम्यान झालेल्या या कार्यक्रमात फिर्यादींनी चोरीला गेलेला ऐवज परत मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी पोलिसांचे आभारही मानले.

नागरिकांच्या कष्टाच्या कमाईतून घेतलेला मौल्यवान ऐवज चोरीला गेल्यास तो लवकर शोधून मूळ मालकांना परत करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे, असे शर्मा म्हणाले. तपास पथकांची तत्परता आणि कौशल्य कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा कामगिरीमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास दृढ होतो, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाला पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि मुख्यालयाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश शिळीमकर उपस्थित होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, संबंधित पोलीस ठाण्यांचे अधिकारी, तपास पथकातील अंमलदार आणि फिर्यादीही कार्यक्रमाला उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *