![]()
जीएसटी भरण्याची प्रक्रिया नव्या आर्थिक वर्षापासून अधिक सोपी होणार आहे. जीएसटीची बिलेही बँकेतील ई-इनव्हॉइसप्रमाणे थेट मिळतील, अशी माहिती आयसीएआयच्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए उमेश शर्मा यांनी दिली.
.
आयसीएआयच्या जीएसटी अँड इनडायरेक्ट टॅक्सेस कमिटी आणि पुणे शाखेने जीएसटीवरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. पुण्यात म्हात्रे पुलाजवळील सिद्धी बँक्वेट येथे परिषदेच्या उद्घाटनावेळी शर्मा बोलत होते.
जीएसटी पोर्टलमध्ये तांत्रिक बदल सुरू आहेत. प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने ही प्रणाली अधिक सोपी आणि स्वयंचलित होईल, असे शर्मा यांनी सांगितले.
एआय आणि क्लाऊडच्या वापराबाबत बोलताना शर्मा म्हणाले की, बँकिंग, करप्रणाली आणि आर्थिक विषयांतील प्रश्नांसाठी जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे. सीएनी लेखापरीक्षण आणि अकाउंटिंगची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी एआय टूल्सचा वापर करावा. वार्षिक कर परतावा भरतानाही तंत्रज्ञानाचा अधिक वापर करावा.
आयसीएआयच्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले की, केंद्र सरकार जीएसटीसह सहकार क्षेत्राला महत्त्व देत आहे. करनियमांमध्ये सतत बदल होत असतात. सीएनी या बदलांकडे संधी म्हणून पाहावे आणि क्षेत्रातील बदलांची माहिती ठेवावी.
तंत्रज्ञानामुळे आर्थिक क्षेत्रातही बदल होत आहेत. ते वेळोवेळी समजून घेतल्यास प्रगती करता येईल, असे चितळे यांनी सांगितले.
कार्यक्रमाला विभागीय समितीचे सदस्य सीए अभिषेक धामणे, पुणे शाखेचे अध्यक्ष सीए प्रणव आपटे, उपाध्यक्ष सीए नीलेश येवलेकर, सचिव सीए नेहा फडके, खजिनदार सीए नंदकुमार कदम आणि परिषदेच्या समन्वयक सीए प्रज्ञा बंब उपस्थित होते. कार्यकारिणी सदस्य सीए सचिन मणियार, सीए सारिका दिंडोकर आणि सीए हृषिकेश बडवेही उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रात सीए अभय देसाई यांनी जीएसटीएटीवर मार्गदर्शन केले. त्यांनी अपील, कार्यपद्धती आणि नव्या आव्हानांवर माहिती दिली. सीए नरेश शेठ यांनी रिअल इस्टेट क्षेत्रातील जीएसटीविषयक प्रश्नांवर चर्चासत्र घेतले.
दोन दिवसांच्या परिषदेत जीएसटीशी संबंधित विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने आणि परिसंवाद आयोजित केले आहेत.