Headlines

पुणे महापालिकेत 34 लाखांच्या कामाला 1.51 कोटींची मंजुरी:निविदा प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा युवक काँग्रेसचा आरोप, चौकशीची मागणी




पुणे महानगरपालिकेच्या बालभारती ते पौड फाटा ३० मीटर डी.पी. रस्ता विकास कामाच्या पर्यावरणीय परवानगी प्रक्रियेतील निविदेत मोठ्या आर्थिक अनियमिततेचा आरोप करण्यात आला आहे. या कामासाठी ‘आदित्य एन्व्हायर्नमेंटल सर्व्हिसेस प्रा. लि.’ या कंपनीने ३४.६५ लाख रुपयांची सर्वात कमी निविदा सादर केली होती. मात्र, स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आलेल्या प्रस्तावात हीच रक्कम १.५१ कोटी रुपये (१.२८ कोटी + जीएसटी) इतकी दाखवण्यात आली आहे. यामुळे एकाच कामासाठी कोणताही ठोस आधार नसताना निविदेच्या रकमेत जवळपास चारपट वाढ करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही केवळ प्रशासकीय चूक नसून जनतेच्या पैशांची उघड लूट असल्याचा गंभीर संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, पहिल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा निविदा काढण्यात आली होती आणि त्यात केवळ एकच निविदा प्राप्त झाली असतानाही ही अवाढव्य रक्कम वाढवण्यात आली. या प्रकरणावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रसारमाध्यम विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी तीव्र टीका केली आहे. ते म्हणाले की, “निविदा एक आणि रक्कम चारपट, हा पुणे महापालिकेचा नवा ‘मॉडेल’ आहे का? गेल्या काही दिवसांत महापालिकेच्या निर्णयात पारदर्शकतेचा अभाव दिसत असून, विकासाऐवजी केवळ ठेकेदारांना फायदा करून देण्याचे काम सुरू आहे.” जैन यांनी पुढे म्हटले की, ३४ लाखांच्या निविदेवर १.५१ कोटींची मंजुरी ही केवळ त्रुटी नसून सिस्टिमॅटिक गैरव्यवहार करून काहींचे खिसे भरण्याचा प्रकार आहे. या पार्श्वभूमीवर, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. तसेच, निविदा रक्कम व मंजुरी रक्कम यातील तफावत स्पष्ट होईपर्यंत संबंधित आर्थिक व्यवहार स्थगित करावेत आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. पुणेकरांच्या करातून उभ्या राहणाऱ्या निधीचा असा गैरवापर होऊ देणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *