Headlines

पुणे स्वच्छता सर्वेक्षणात आठव्या क्रमांकावरून बाराव्या क्रमांकावर घसरले:प्रशांत जगताप यांनी भाजपला विचारला जाब; 3,500 कर्मचाऱ्यांची भरती आणि 3,500 कोटींच्या खर्चानंतरही घसरण




केंद्रापासून महापालिकेपर्यंत भाजपची सत्ता असतानाही पुणे शहराची स्वच्छता आणि पर्यावरणाच्या बाबतीत घसरण सुरूच असल्याची टीका काँग्रेसचे पुणे (पूर्व) शहराध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केली. स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये पुणे शहराची आठव्या क्रमांकावरून बाराव्या क्रमांकावर घसरण झाल्याच्या मुद्द्यावर त्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी भाजपला धारेवर धरले. शहराच्या स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असताना आणि सुमारे ३५०० स्वच्छता कर्मचाऱ्यांची भरती केल्यानंतरही पुण्याची क्रमवारी घसरली कशी, असा सवाल जगताप यांनी उपस्थित केला. स्वच्छतेसाठी करण्यात आलेला खर्च आणि प्रत्यक्ष शहरातील स्वच्छतेची स्थिती यामध्ये मोठी तफावत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. महापालिकेच्या तिजोरीवर सुमारे ३५०० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडूनही अपेक्षित परिणाम दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला. पुण्यातील वाढते वायुप्रदूषण हाही जगताप यांनी गंभीर मुद्दा उपस्थित केला. शहरातील हवेची गुणवत्ता खालावत असून नागरिकांना शुद्ध हवा मिळणे कठीण होत असल्याचे त्यांनी म्हटले. स्वच्छतेबरोबरच प्रदूषण नियंत्रणातही प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना अपयश आल्याचा आरोप त्यांनी केला. ‘गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असताना पुणे शहराची स्वच्छता आणि प्रदूषणाच्या प्रश्नांवर अशी परिस्थिती का निर्माण झाली आहे? केवळ कर्मचारी भरती आणि कोट्यवधींचा खर्च करून शहर स्वच्छ होणार नाही. त्यासाठी प्रभावी नियोजन आणि जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे,’ अशा शब्दांत जगताप यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले. स्वच्छ सर्वेक्षणातील घसरणीची कारणे शोधून शहराच्या स्वच्छतेसाठी ठोस कृती आराखडा तयार करावा, अशी मागणीही त्यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *