![]()
मधुमेहामुळे पायांच्या नसांवर आणि रक्तवाहिन्यांवर होणारा परिणाम अनेकदा सुरुवातीला लक्षात येत नाही. त्यामुळे पायांवरील लहान जखमांचेही पुढे गंभीर संसर्गात रूपांतर होऊन काही वेळा पाय किंवा बोटे कापण्याची वेळ येते. या संभाव्य धोक्यांचे वेळीच निदान व्हावे आणि मधुमेही रुग्णांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी हीलिंग हँड्स क्लिनिकतर्फे रविवार, १५ नोव्हेंबर रोजी पुण्यात मोफत डायबेटिक फूट तपासणी व स्क्रीनिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १४ नोव्हेंबरच्या जागतिक मधुमेह दिनानिमित्त आयोजित हे शिबिर ढोले पाटील रोड येथील हीलिंग हँड्स क्लिनिकमध्ये सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणार आहे. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे पायांच्या तपासणीसाठी अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. डायबेटिक फूट सर्जन डॉ. सिमरनजीत कौर यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक रुग्णांची तपासणी करणार आहे. मधुमेहामुळे पायांतील संवेदना कमी होणे, रक्ताभिसरणात अडथळे निर्माण होणे आणि जखमांची जाणीव न होणे अशा समस्या उद्भवू शकतात. परिणामी, किरकोळ जखम किंवा व्रणही गंभीर स्वरूप धारण करू शकतात. विशेष म्हणजे, अनेकदा वेदना किंवा अन्य स्पष्ट लक्षणे नसतानाच पायांचे नुकसान होत असते. शिबिरात नसांची संवेदनशीलता, रक्ताभिसरण, पायांवरील दाबाचे बिंदू, चालण्याची पद्धत, पायांची रचना, घट्टे तसेच वापरल्या जाणाऱ्या बुटांमुळे निर्माण होणारे धोके तपासले जाणार आहेत. भविष्यात पायांवर व्रण किंवा अल्सर होण्याची शक्यता निर्माण करणारी सुरुवातीची लक्षणे ओळखण्यावर भर दिला जाणार आहे. या शिबिरातील सर्व तपासण्या पूर्णपणे मोफत असतील. मधुमेह असलेल्या रुग्णांनी कोणतीही जखम किंवा वेदना जाणवण्याची वाट न पाहता नियमितपणे पायांची तपासणी करून घ्यावी. वेळीच निदान आणि उपचार केल्यास गंभीर गुंतागुंत व अवयव गमावण्याचा धोका कमी करता येऊ शकतो, असे आवाहन हीलिंग हँड्स क्लिनिकच्या संचालिका (ऑपरेशन्स) डॉ. यास्मिन शेख यांनी केले आहे.
Source link
पुण्यात मधुमेही रुग्णांसाठी मोफत पाय तपासणी शिबिर:15 नोव्हेंबरला ढोले पाटील रोडवरील हीलिंग हँड्स क्लिनिकमध्ये एआय तंत्रज्ञानाने स्क्रीनिंग