![]()
नैसर्गिक आपत्ती, दुष्काळसदृश्य परिस्थिती, कीड व रोगांमुळे पिकांच्या उत्पादनात घट झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२६-२७ मध्ये राबविण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात या योजनेंतर्गत गहू, ज्वारी, मका, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग, हरभरा आणि कांदा या सात पिकांसाठी विमा नोंदणी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी विहित मुदतीत आपल्या पिकांचा विमा उतरवून घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी पीक विमा महत्त्वपूर्ण ठरतो. विमा संरक्षित पिकांच्या उत्पादनात घट झाल्यास नियमानुसार नुकसानभरपाई देण्यात येते. त्यामुळे रब्बी हंगामातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. रब्बी हंगामात ज्वारी पिकासाठी विमा नोंदणीची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२६ आहे. तर गहू, हरभरा व कांदा या पिकांसाठी १५ डिसेंबर २०२६ आणि उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत विमा नोंदणी करता येणार आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागाची संधी या योजनेत कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. शेतात प्रत्यक्ष पेरणी केलेल्या पिकाचाच विमा उतरविणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास त्यांनी संबंधित बँकेत विमा हप्ता कपात न करण्याबाबत अंतिम मुदतीच्या किमान सात दिवस आधी लेखी घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. पीक विमा नोंदणीसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना पोर्टल, क्रॉप इन्शुरन्स ॲप, जवळची बँक, सीएससी केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे संपर्क साधता येईल. ११ दिवसांत ५९९ अर्ज; ३९२ हेक्टर क्षेत्र संरक्षित पुणे जिल्ह्यात २ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पीक विमा योजनेसाठी ५९९ अर्ज प्राप्त झाले असून, त्याद्वारे ३९२ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी सर्वाधिक कांदा पिकाचा विमा उतरविला आहे. त्याखालोखाल ज्वारी, हरभरा, मका आणि गहू या पिकांसाठी विमा नोंदणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आपल्या पिकांचा विमा उतरवून घ्यावा. नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनात घट झाल्यास आर्थिक नुकसानभरपाई मिळण्यासाठी पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.
Source link
पुणे जिल्ह्यात रब्बी पिकांसाठी विमा नोंदणी सुरू:ज्वारीसाठी 30 नोव्हेंबर, गहू, हरभरा आणि कांद्यासाठी 15 डिसेंबर अंतिम मुदत; 11 दिवसांत 599अर्जांमधून 392 हेक्टर विमा संरक्षित